जगात आजमितीला कोणालाही कोणासाठी थांबण्यासाठी वेळ नाहीच; पण भवताली काय घडते आहे, हे पाहण्यासाठीही कोणाला फुरसत नाही. ‘आपलं काम भलं नि आपलं घर भलं’ असा दैनंदिन शिरस्ता असतो. धावपळीच्या जगात मन:शांती गमावून बसलेला शहरी माणूस अशी ओळख आज बनून राहिली आहे. ती कुठेतरी असते याचा साक्षात्कार होतो तेव्हा मात्र कुटुंब ही संकल्पना किती प्रभावी आहे, याची अनुभूती येते. नेरुळमधील विश्वशांती अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या आवारात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरलं की हे बरोबर कळतं..

नेरुळ येथील विश्वशांती अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या संकुलातील रहिवाशांच्या वर्तनातून शांतीची गोष्ट ऐकायला आणि पाहायला मिळते. येथील प्रत्येकाने आपल्या वर्तनाने आणि व्यवहाराने आपले गृहसंकुल शांतीचे विश्व असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. येथील रहिवाशी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यात सर्वोत्तम पातळीवर नेण्याचा ध्यास घेऊनच काम करतात आणि पुढाकार घेऊन त्यासाठी झटत असतात.

‘विश्वशांती अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन’ ही नेरुळमधील उत्कृष्ट गृहनिर्माण संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. या गृहसंकुलाच्या उभारणीस ३० वर्षे लोटली आहेत. ६८ गुंठय़ांमध्ये इथल्या इमारती उभ्या आहेत. एकूण सात इमारतींमध्ये २१० सदनिका आहेत. या संस्थेची ओळख महानगरीय आहे. म्हणजे विविध भाषिक या संकुलात रहिवास करतात. एकत्रित कुटुंबाची भावना येथील प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळे संकुलातील एकमेकांबद्दल आदर ही येथील पुंजी आहे. आपुलकीचे खेळते भांडवल तर प्रत्येकाकडे आहे. आपलेपणा गुंतवणूक आणि दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचे मानसिक समाधान अशी ठेव परतीच्या तत्त्वावर इथे अनेक जण गुंतवत असतात. या साऱ्या व्यवहारात चांगला परतावा मिळत असल्याने ‘विश्वशांती’ हे संकुलाचे नाव प्रत्येकाने शब्दश: खरे करून दाखवले आहे.

या संकुलात येणारे नवे कुटुंब या संकुलात स्थायिक होण्यास पसंती देत आहे. संस्थेमध्ये भाडेकरू आणि मालक असा भेद नावापुरताही नाही. वर्षभरात साजरे होणाऱ्या सणांमध्ये पुढाकार घेऊन त्याचा आनंद घेण्याचा प्रत्येकाचा उत्साह असीमित असतो. ‘विश्वशांती’ संकुलाचे यातील वैशिष्टय़ वेगळे आहे. येथे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे समाजोपयोगी कार्यक्रमही आखले जातात. गणेशोत्सव येथे मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. लोकमान्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश येथे प्रत्यक्षात उतरवला जातो. सुबक मूर्ती हे संकुलातील उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना ते त्यानंतरचे श्रीसेवेची सर्व जबाबदारी संकुलातील प्रत्येक जण वाटून घेतो. नेरुळमधील सार्वजनिक गणेश मंडळांत या संकुलाचा नावलौकिक आहे. पुणेरी ढोल, एकाच पद्धतीचा गणवेश परिधान करून गणेशाचे जल्लोषात आगमन केले जाते आणि तेवढय़ाच भक्तीभावाने निरोप दिला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले आहे.

याशिवाय नवरात्री, दीपावली, ईद आणि ख्रिसमससारखे इतर सण तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. संकुलातील रहिवाशांना आनंदाचा तोटा नसतो. संकुलातील विद्यार्थी शिक्षणाकडे अधिक भर देतात. पालकांचाही त्यात मोठा वाटा असतोच पण शेजारीही विद्यार्थ्यांला त्यासाठी मार्गदर्शन करतात. अभ्यासात एखाद्या विद्यार्थ्यांला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी दक्ष असलेले शेजारी विद्यार्थ्यांने यश संपादन केल्यानंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पुढे असतात. विद्यार्थ्यांसाठी पुढील वाटचालीसाठी ही थाप साहाय्यकारी असते, हे त्यातील सर्वात मोठे वैशिष्टय़े.

नवी मुंबई पालिकेने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्यानंतर संकुलातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन ओला आणि कचरा वेगळा करूनच तो दारात ठेवला. यासाठी पालिकेच्या सफाई कामगारांना फार कष्ट पडले नाहीत. संकुलाच्या वतीने प्रत्येकाला कचऱ्यासाठी दोन डब्बे दिले आहेत. संकुलातील स्वच्छता ही आकर्षून घेणारी गोष्ट आहे.

नीटनेटका आदर्श

या संकुलातील कुटुंबांच्या नीटनीटकेपणाचा आदर्श इतरांनी घेऊन त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीपथाच्या वाटचालीवर नेहमीच विचारपूर्वक भूमिका बजावणाऱ्या या वसाहतीला स्वच्छतेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. ‘विश्वशांती’ संकुलाला २०१३चा अश्वमेध प्रतिष्ठान आणि नेरुळ पोलीस ठाण्याच्या वतीने ‘उत्कृष्ट सोसायटी’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwashanti apartment in nerul