शिक्षण क्षेत्रात, कुठल्याही स्तरावर शिक्षक हा कळीची भूमिका बजावतो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसे प्रथम शिक्षकाच्या अनेक कार्यांत मदत करणाऱ्या प्रणाल्या विकसित केल्या गेल्या. त्यानंतर यंत्रमानव हा शिक्षक म्हणून विकसित करण्याचे उपक्रम सुरू झाले.

अंकीय अध्यापन साहाय्यक (डिजिटल टीचिंग असिस्टंट) अशी भूमिका बजावणाऱ्या विविध प्रणाल्या उपलब्ध आहेत. त्या पाठ्यक्रमातील विषयांवरील धडे तपासून, विद्यार्थ्यांनी त्यातील अपेक्षित ज्ञान आणि कौशल्य ग्रहण करण्याची पातळी आणि त्या संदर्भात प्रश्न कसे असावेत याची रूपरेषा सादर करतात. शिक्षक आपला अनुभव तसेच स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित राखत त्यांच्याशी संवाद साधून अंतिम प्रश्नपत्रिका आणि मूल्यमापन निकष ठरवू शकतात.

शिक्षकांचा तुटवडा लक्षात घेऊन लंडनस्थित ‘‘ओटरमन्स इन्स्टिट्यूट’’ या संस्थेने जगातील प्रथम कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्रमानवी शिक्षिका मे २०२३ मध्ये पुढे आणली. तिचे नाव आहे ‘बिअट्रीस’. त्याच धर्तीवर चित्रात दाखवलेली स्वतंत्रपणे वर्गात फिरू शकणारी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत अध्यापन करणारी यंत्रमानव शिक्षिका फेब्रुवारी २०२४ मध्ये केरळ राज्यात प्रस्तुत केली गेली. तिचे नाव ‘आयरिस’ असून ती १२ वीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम या तीन भाषांत देऊ शकते.

हेही वाचा >>> कुतूहल: शिक्षणक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रत्येक विद्यार्थ्याच्या ग्रहणक्षमता आणि अध्ययन शैलीनुसार त्याला शिकवणे, लगेच प्रतिसाद देणे, कुठल्याही वेळी मदत करणे, विविध भाषांत शिकवणे, भरपूर चित्रे आणि दृक्श्राव्य माध्यमांचा उपयोग करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सेवा देणे, सुसंगत मूल्यांकन करणे, विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाच्या संदर्भात ताजी माहिती देऊन काळासोबत ठेवणे, असे अनेक फायदे यंत्रमानव शिक्षकामुळे मिळू शकतात.

प्रश्न असा आहे की, किशोरवयातील विद्यार्थ्यांच्या भावना समजून त्यांना मार्गदर्शन करणे, सुजाण व्यक्ती घडवणे, तसेच त्यांच्यासाठी आदर्श म्हणून वागण्यात असे मानवी अनुभूती नसलेले यांत्रिक शिक्षक कितपत यशस्वी होतील? यंत्रात संरचित नीतीमूल्ये विद्यार्थ्यांचा विकास एकांगी तर नाही करणार? त्यामुळे यंत्रमानवामार्फत शिक्षण कसे द्यावे याची आचारसंहिता तयार करणे आवश्यक आहे.

या विकासामुळे शिक्षकी पेशा धोक्यात येईल का हा प्रश्न त्यामुळे सर्वदूर चर्चेत आहे. मात्र दुर्गम भागांत अशा शिक्षकांची सेवा घेणे उपयुक्त ठरेल असे मत आहे. मानवी शिक्षकाला अधिक सक्षम होऊन यांत्रिक शिक्षकाचा कल्पकतेने उपयोग करून घेणे हे संधीयुक्त आव्हान आहे.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org