वनस्पतींच्या पानांच्या आकारांमध्ये खूप विविधता असते. पण एकाच झाडाच्या सर्व पानांचा ‘आकार’ सारखाच असतो का? इथे ‘आकार’ या शब्दामागे दोन अर्थ दडलेले आहेत. आकार म्हणजे पानांचा ‘घाट’ किंवा ‘आकृती’ आणि आकार म्हणजे पानांची ‘व्याप्ती’ किंवा ‘लांबी-रुंदी’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण एकाच झाडाच्या पानांच्या आकारांबद्दल म्हणजे ‘घाट’ आणि ‘व्याप्ती’ या दोन्ही गोष्टींचा विचार करू या. एका वनस्पतीच्या सर्व पानांचा ‘घाट’, जगात कुठेही सारखाच असतो. उदाहरणार्थ, जगातल्या कुठल्याही भागातल्या आंब्याची पाने सारखीच असतात, म्हणजे त्यांचा पुढे टोकदार असलेला घाट, सर्व ठिकाणी सारखाच असतो. जास्वंद, पेरू, चिकू, कोणत्याही झाडाचा विचार करा; त्यांच्या पानांचा घाट किंवा आकृती सारखीच असते, पण ती इतर झाडाच्या पानांपेक्षा वेगळी असते. म्हणून तर पानांच्या ‘घाटा’कडे पाहून, आपण ते झाड कशाचं आहे ते ओळखू शकतो. पण आता आपण एखाद्या झाडाच्या, एखाद्या फांदीवर असलेली पाने पाहू या. एकाच फांदीवरच्या सगळय़ा पानांचा आकार सारखाच असतो का? अजिबात नसतो. सर्वसाधारणपणे, फांदीच्या खालच्या बाजूला असलेल्या पानांपेक्षा वरच्या टोकाकडची पाने आकाराने लहान असतात, म्हणजेच त्यांची लांबी-रुंदी कमी असते, व्याप्ती कमी असते. असं का बरं?

पानांचे मुख्य काम म्हणजे वनस्पतीसाठी अन्न तयार करणे. त्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड वायू पाने त्यांवर असलेल्या पर्णछिद्रांतून शोषून घेतात. जेव्हा वनस्पतीची वाढ होऊ लागते, तेव्हा फांदीवर नवनवीन पाने उगवतात. वरच्या बाजूला नवीन येत जाणाऱ्या पानांमुळे, खालच्या पानांवर सावली पडण्याची शक्यता किंवा खालच्या पानांची छिद्रं खाली जाण्याची प्रक्रिया सुरू होते. तेव्हा पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून पानांची व्याप्ती वाढते. पाने आकाराने मोठी होऊ लागतात आणि खालच्या पानांना आपला जास्त अडथळा होऊ नये, म्हणून फांदीच्या वरच्या बाजूची पाने आकाराने लहानच राहातात. तर अशी ही निसर्गाची किमया! एकमेकांना मदत करण्यासाठी, एकाच फांदीवरच्या पानांचा आकार म्हणजे ‘व्याप्ती’ कमी जास्त असते; जरी त्यांचा आकार म्हणजे ‘घाट’ सारखाच असला तरी!

डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lot of variation in the leaf shapes of plants zws
First published on: 29-11-2022 at 04:03 IST