-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये व्यापक आणि कठोर फेरबदल करताना १२ मंत्र्यांची हकालपट्टी केली. मात्र यात रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याची चर्चा जास्त होत आहे. ट्विटरसोबत वाद सुरू असतानाच रवीशंकर प्रसाद यांना राजीनामा द्यावा लागल्यानं सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.
-
मंत्रिमंडळ विस्ताराअगोदर आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक या बडय़ा मंत्र्यांचीही गच्छंती झाली.
-
महत्त्वाचं म्हणजे नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू करण्यावरून केंद्र सरकार विशेषतः कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद आणि ट्विटर यांच्या संघर्ष ठिणग्या उडताना दिसत होत्या.
-
रवीशंकर प्रसार यांचं ट्विटर हॅण्डल तासाभरासाठी ब्लॉक करण्यात आल्यानंतर हा संघर्ष शिगेला पोहोचला होता.
-
ट्विटरसोबतच्या वादावरून बरंच रणकंदन सुरू असतानाच रवीशंकर प्रसाद यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ट्विटरच्या आनंदाला पारावारच राहिला नसेल अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत.
-
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करून मोदी यांनी मोठय़ा बदलांचे संकेत दिले होते.
-
मात्र, मोदींवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी न सोडणारे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
या दोघांकडे एकापेक्षा जास्त मंत्रिपदांची जबाबदारी होती.
-
रवीशंकर यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, विधि व दूरसंचार खात्याचे मंत्रीपद देण्यात आले होते.
-
सातत्याने आक्रमकभूमिकेत असणारे रवीशंकर प्रसाद ‘ट्विटर’च्या संघर्षांमुळे वादात सापडले होते.
-
समाजमाध्यमांवरून जाहीरपणे मतभेद चव्हाटय़ावर मांडण्याच्या प्रवृत्तीचा फटका मंत्रीपद गमावण्यात झाल्याचे मानले जाते.
-
प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण, पर्यावरण व अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. कोणत्याही वादात केंद्र सरकारची बाजू मांडणारे प्रकाश जावडेकर हे केंद्राचे प्रवक्ते होते.
-
मंत्री होण्यापूर्वी जावडेकर यांनी पक्षाचे प्रवक्तेपदही सांभाळले होते. रवीशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
-
पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांचीही हकालपट्टी झाली असून, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत सुप्रियो यांचा पराभव झाला होता. राज्यमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी प्रभावी नसल्याने त्यांना पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते.
-
केंद्रात रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर हे माध्यमप्रिय मंत्री होते.
-
त्यांच्या राजीनाम्यामुळे या दोघांनाही पक्षात जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी, राज्यात तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक धोरण राबवले जात असून, देबश्री चौधरी व बाबूल सुप्रियो यांना पश्चिम बंगालमध्ये अधिक सक्रिय केले जाण्याची शक्यता आहे.
-
नव्या रचनेत मोदींच्या मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत.
-
सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले तरी, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
-
आरोग्य, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, विधि, सामाजिक न्याय, रसायने व खते, नागरी पुरवठा, अवजड उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, कामगार कल्याण अशा किमान १२ मंत्रालयांसाठी नवे केंद्रीय तसेच, राज्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.
-
यांना डच्चू… हर्षवर्धन, रमेश पोखरियाल, प्रकाश जावडेकर , रवीशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, संजय धोत्रे, सदानंद गौडा, संतोष गंगवार, देबश्री चौधरी, बाबूल सुप्रियो, प्रताप सारंगी, रतनलाल कटारिया
रवीशंकर प्रसाद, जावडेकर यांच्या राजीनाम्यानंतर ‘मीम्स’चा महापूर…
रवीशंकर प्रसार यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या आनंदाला पारावारच राहिला नसेल अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत.
Web Title: Modi cabinet reshuffle modi new cabinet ravi shankar prasad resigns memes twitter bmh