Pune Porsche Car Accident Latest Update : पुणे अपघातप्रकरणात मूळ आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिल आणि आजोबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पुणे जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना त्यांच्या मुलाच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागत आहे. तर, अल्पवयीन चालकाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच, पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे.

दरम्यान, अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात ५ जूनपर्यंत ठेवण्यात आलं आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवलं आहे. परंतु, त्याची चौकशी करता यावी याकरता पुणे पोलिसांनी परवानगी मागितली आहे, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले.

हेही वाचा >> पुणे कार अपघात प्रकरण : रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोघा डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दोन डॉक्टर आणि एका शिपयालाही कोठडी

तर, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तीन आरोपींना काल (३० मे) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद झाला. त्यावेळी तिन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्या मागणीला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध दर्शविला. मात्र त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे समोर आले आहे. रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले, तेव्हा आरोपीची आई रुग्णालयात हजर होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >> Pune Porsche Crash: रक्त चाचणीच्या फेरफारात आईचाही समावेश, आरोपीच्या जागी आईने रक्त दिले

अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर

बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाप्रमुख म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याची शिफारस समितीने सादर केलेल्या अहवालात केली आहे.

ससून रुग्णालयाते अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आंनी तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते. डॉ. तावरे यांच्यावर याआधी मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि अमली पदार्थ तस्करी या प्रकरणी आरोप आहेत. तरी त्यांची न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 days judicial custody to vishal and surendra agarwal letter from police to interrogate minor sgk