नवरात्रोत्सवात फलकावर छायाचित्र न लावल्याने चौघांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली आहे. राजाराम विष्णू पठारे (वय ५२), बाळासाहेब विष्णू पठारे (वय ५८), स्वप्नील बाळासाहेब पठारे (वय २४) आणि सौरव राजाराम पठारे (वय २०, सर्व रा. मुंजाबा चौक, खराडी गावठाण) यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कैलास दत्तात्रय पठारे (वय ४१, रा. खराडी गावठाण) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कैलास पठारे यांच्या मंडळाकडून खराडी गावठाणात नवरात्रोत्सवात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे फलकावर छायाचित्र लावण्यात आले होते. आरोपींनी आमचे छायाचित्र का लावले नाही, अशी विचारणा कैलास यांच्याकडे केली. उत्सवातील खर्च मी केला आहे. फलकावर कोणाचे छायाचित्र वापरायचे, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे कैलास यांनी आरोपींना सांगितले. तेव्हा आरोपी राजाराम, बाळासाहेब, स्वप्नील, सौरव यांनी कैलास यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. गज आणि काठीने कैलास यांना मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.