पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात एका गोदामावर पुणे पाेलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे. आरोपी गोदामात गुटखा तयार करत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे.

पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय २७, रा. नऱ्हे, मूळ रा. उत्तरप्रदेश), सुनील पथ्थन सिंग (वय ४५, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (वय २८, रा. आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान), चंदन अजयपाल सिंग (वय ३२, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींचा साथीदार निलेश ललवानी (वय ४०, रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. आरोपींविरुद्ध अन्नसुरक्षा मानदे कायदा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ससूनचे कामकाज ‘पारदर्शक’ होणार? कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे पाऊल; अनेक बदल प्रस्तावित

हेही वाचा – पुरंदर विमानतळ नेमके कोणत्या टप्प्यावर? केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी दिलं उत्तर

राज्यात गुटखा बंदी आहेत. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे भागातील गोदमात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गोदामातून शहर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना गुटखा विक्रीस पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते, शनिवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.