पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्यानंतर ससून रुग्णालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आला. यामुळे रुग्णालय प्रशासनाने आता कामकाजात पारदर्शकता आणण्याची पावले उचलली आहेत. आपत्कालीन विभागात बदल करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने अनेक बदल सूचविले असून, लवकरच त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ससूनमधील आपत्कालीन विभागात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर एकंदरीत ससूनच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला.

हेही वाचा – पुरंदर विमानतळ नेमके कोणत्या टप्प्यावर? केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी दिलं उत्तर

डॉ. म्हस्के यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तातडीने आपत्कालीन विभागात सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती नेमली. या समितीने नुकताच आपला अहवाल अधिष्ठात्यांना सादर केला आहे. हा अहवाल ११७ पानांचा आहे. त्यात न्यायवैद्यक प्रकरणांबाबत आपत्कालीन विभागात घ्यावयाच्या उपाययोजना सविस्तरपणे मांडण्यात आल्या आहेत. आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी न्यायवैद्यक प्रकरणात कोणत्या पद्धतीने काम करावे, याची नियमावलीही समितीने सूचविली आहे.

न्यायवैद्यक प्रकरणातील व्यक्तींनी ससूनच्या आपत्कालीन विभागात तपासणीसाठी आणले जाते. अशा वेळी तेथील कामकाज अधिक पारदर्शक राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन विभागात लवकरच अनेक बदल केले जाणार असून, तेथील काम अधिक नियोजनबद्ध करण्यात येणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर! स्थानकांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोपे अन् जलद

आपत्कालीन विभागासाठी समितीने केलेल्या शिफारशी

  • विभागातील कर्मचाऱ्यांना न्यायवैद्यक प्रकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देणे.
  • न्यायवैद्यक प्रकरणात रक्ताचे नमुने घेण्याबाबत नियमावलीचे पालन करणे.
  • विभागात न्यायवैद्यक प्रकरणांसाठी दोन वेगळ्या नोंदवह्या ठेवणे.
  • विभागाच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यात यावा.
  • विभागात रक्तनमुने घेण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे.