पुणे : शेतकऱ्यांचा शेतमाल थेट सोसायटय़ांमधील ग्राहकांच्या दारात नेण्याची कॉपशॉप योजना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने (एमसीडीसी) सुरू केली होती. त्यानुसार पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून पाच विक्री केंद्रेही (कॉपशॉप) सुरू करण्यात आली होती. तसेच ही योजना राज्यभर कार्यान्वित करण्यात येणार होती. मात्र, पुण्यातील पाच केंद्रे ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी बंद करण्यात आली असल्याने ही योजना राज्यभर नेण्याचा मानस बासनात गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून एमसीडीसीकडून कॉपशॉप केंद्रामार्फत पुणेकरांना कोणत्याही मध्यस्थाविना थेट शेतमाल देण्याची योजना आहे. पुणे शहरात पाच ठिकाणी भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थासह दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू या विक्री केंद्रांद्वारे (कॉपशॉप) विक्री करण्यात येत होत्या. करोना काळात निर्बंधांमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने या केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे महामंडळाने शहरात आणखी पाच कॉपशॉप केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यभर सर्वत्र कॉपशॉप केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर अशा राज्यातील महानगरांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार होती. मात्र, आता पुण्यातील पाचपैकी चार केंद्रे बंद करावी लागली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी हाउसिंग सोसायटी, हांडेवाडी येथील रूणवाल हाऊसिंग सोसायटी, शिवाजीनगर येथील साखर संकुल आणि तळेगाव येथील ला मोन्टागा हाऊसिंग सोसायटी येथे ही केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांना प्रतिसाद मिळत नसल्याने साखर संकुल वगळता इतर ठिकाणची केंद्रे बंद करण्यात आली आहेत किंवा अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मििलद आकरे यांनी दिली. 

नेमकी संकल्पना काय?

राज्यातील सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि महिला बचत गट यांची उत्पादने कॉपशॉप या उपक्रमाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. ही केंद्रे कायमस्वरूपी विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. विक्री केंद्रांमध्ये १६६ उत्पादनांचा समावेश होता. त्यामध्ये १५ महिला बचत गट, १२ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सात सहकारी संस्थांचा समावेश होता. दररोज प्रत्येक विक्री केंद्रात पाच हजार रुपयांची उलाढाल देखील होत होती, मात्र करोना काळानंतर ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने ही केंद्रे बंद करावी लागली आहेत.

पुण्यात पाच कॉपशॉप सुरू करण्यात आली होती. कॉपशॉपमध्ये मिळणारा माल घाऊक, किरकोळ बाजारपेठेत त्याच किमतीत मिळतो. मात्र कॉपशॉपमधील मालावर प्रक्रिया केलेली नसते. तो थेट शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल असतो. मात्र ग्राहकांना याची कल्पना नसल्याने ग्राहकांकडून किमतीवर जास्त लक्ष केंद्रित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

– मिलिंद आकरे, व्यवस्थापकीय संचालक, एमसीडीसी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copshop farmer consumer concept ysh