लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महानगरपालिकेच्या पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्याने एक दिवस वाहनांपासून मोकळा श्वास घेतल्यानंतर गुरुवारी या रस्त्यावर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या. पादचारी दिनाचे सोपस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा पदपथांचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याचे चित्र दिसून आले.

पुणे महापालिकेतर्फे लक्ष्मी रस्त्यावर ११ डिसेंबर हा पादचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ पादचाऱ्यांसाठी हा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. या दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून मुक्त विहार केला. मात्र गुरुवारी सकाळपासून रस्त्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ दिसून आली. वाहतूक नियंत्रण दिव्यांमुळे (सिग्नल) वाहनांच्या लागलेल्या रांगा, लक्ष्मी रस्त्यालगत असणाऱ्या गल्लीबोळांमध्ये वाहनांची गर्दी झाली होती. पदपथांचा ताबा पथारीवाले आणि विक्रेत्यांनी घेतल्याने पादचारी पुन्हा रस्त्यावर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पुणे महापालिकेतर्फे लक्ष्मी रस्त्यावर ११ डिसेंबर हा पादचारी दिन उत्साहात साजरा झाला. मात्र दुसऱ्या दिवशी पदपथ विक्रेत्यांनी पुन्हा व्यापले गेल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-पालकांनो सावधान ! मुलांना व्हॅन, रिक्षा, बस मधून शाळेत पाठवताय?

लोखंडी अडथळ्यांचाच अडथळा

पादचारी दिनानिमित्त वाहतूक पोलिसांकडून रस्ता बंद करण्यासाठी प्लास्टिकचे आणि लोखंडी अडथळे उभारले होते. ते दूर करून वाहनांसाठी रस्ते मोकळे करून दिले असले, तरी हे अडथळे पदपथांवर आणि रस्त्यांच्या कडेला अस्ताव्यस्त ठेवल्याने कुंटे चौकातून गरूड गणपती चौकाकडे पायी चालणाऱ्यांना वळसा घेऊन जावे लागत होते. महापालिकेतर्फे उभारलेल्या सभामंडपाचा काही भाग तसाच ठेवल्याने अडथळा झाला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Footpaths of lakshmi road are once again crowded with street vendors and vehicles pune print news vvp 08 mrj