राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. शरद पवारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात प्रथमच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन झालं आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजनमान झाले. तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असले तरी हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास नेत्यांकडून वारंवार व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाला एकमताने सहमती दर्शवण्यात आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झालं असं की, सोमवारी इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दत्तात्रय भरणे यावेळी भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं. मात्र भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला. यानंतर स्टेजवर उपस्थित इतर मान्यवरांनी त्यांना रोखलं आणि चूक लक्षात आणून दिली.

यावेळी उपस्थितांमध्ये काहींना आश्चर्य वाटलं तर काहीजण हसू लागले. यानंत दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ आपली चूक सुधारली आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत त्यांना आपण दिवसभर किती व्यस्त असतो, गाडीतच जेवावं लागतं, वाहतूक कोंडीत अडकलो असं सांगत सावरण्याचा प्रयत्न केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dattatray bharne mentions devendra fadanvis as cm instead of uddhav thackeray during speech in pune sgy