पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथक एकने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आले आहे.
ऋतिक कैलास एखंडे (वय २३, रा. एरंडवणा गावठाण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी
शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांकडून गस्त घालण्यावर भर दिला जात असून पाहिजे आणि फरार आरोपींची माहिती काढली जात आहे. यादरम्यान, पुण्याच्या मध्यभागात गुन्हे शाखेने एक कारवाई केली होती. त्यावेळी पिस्तूल पकडण्यात आले होते. मात्र, त्यातील आरोपी ऋतिक एखंडे हा फरार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता.
हेही वाचा…आळंदीच्या इंद्रायणीत तरुणीने घेतली उडी; गेल्या चार दिवसात उडी घेतल्याची दुसरी घटना
यादरम्यान, पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे आणि मयूर भोकरे यांना ऋतिक हा कर्वे नगर येथील सहवास कॉर्नर येथे येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने या भागात सापळा रचून ऋतिकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे पिस्तूल असल्याचे समजले. त्याच्या घरातून हे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाचा, डेक्कन येथे आर्म ॲक्ट तसेच उत्तमनगर पोलिसांत खुनाचा प्रयत्नासह इतर आणि हिंजवडीत आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.