पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठीची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्यांची निवड यादी १२ जूननंतर जाहीर करण्यात येणार आहे. 

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई प्रवेशांची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.  प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  राज्यातील  ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार २१६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेत प्रवेशासाठी सर्वाधिक २ हजार २१७ अर्ज आले आहेत.

हेही वाचा >>>राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

 सोडतीनुसार निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी न्यायालयाचा आदेश आल्यास १२ जूननंतर प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लघुसंदेश प्राप्त होईल. त्यानंतर तालुकास्तरावर समितीकडून कागदपत्र पडताळणी होऊन प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती गोसावी यांनी दिली.