छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत चुकीची विधाने कोणत्याही पक्षाचे नेते करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान करतो हे चुकीचे आहे. कोणत्याही पक्षातील नेत्याने महाराजांबाबत बोलताना हजारवेळा विचार करून बोलावे असाही इशारा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांंना अप्रत्यक्षरित्या दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ

बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने नाना पेठेत पुण्यातील पहिल्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहराध्यक्ष नाना भानगिरे, युवा सेना सचिव किरण साळी, सह संपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते.

खंजीर, खोके, गद्दार एवढेच विषय विरोधकांकडे आहेत. पायाखालची वाळू सरकल्यानेच अशी भाषा केली जात आहे. खोके कोणाकडे यायचे आणि कोण मोजायचे हे राज्याला माहिती आहे. या टीकेला कामातूनच उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेला उत्तर दिले. ‘वर्षा’ निवासस्थानाची दरवाजे सर्वसामान्यांसाठी अडीच वर्षे बंद होती. मात्र आता दरवाजे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी पाच महिन्यांपासून खुली आहेत, असेही डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव

अडीच वर्षात जे काम झाले नाही. ते काम शिंदे सरकारने पाच महिन्यात केले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी निर्णय घेत त्याची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री पद असताना कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यात आले नाही, त्यामुळे उठाव झाला. पन्नास आमदार आणि तेरा खासदार शिंदे गटाकडे आहेत. पुण्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ऐतिहासिक लाल महालमधील ध्वनी प्रकाश योजना सुरू करण्याचा आणि शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde is on governor bhgat shingh koshyari statement about chhatrapati shivaji maharaj pune print news dpj