राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असली, तरी हा प्रश्न फक्त पुण्यापुरताच नाही. अमली पदार्थ ज्या सहजपणे उपलब्ध होत आहेत आणि तरुण पिढी ज्या वेगाने त्यांच्या आहारी जात आहे, ते सगळे खरोखरच चिंताजनक आहे. काही हॉटेल्स आणि पब्जवर धाडी घालून हा प्रश्न सुटणार आहे का? त्याच्या मुळाशी जायची आपली इच्छा आणि तयारी आहे का?

पुण्यात अफूगांजा, चरस या अमली पदार्थांचे सेवन श्रमिक आणि उच्चभ्रू वर्गात केले जात होते, त्याला आता जवळपास ३० वर्षे उलटून गेली. १९९० च्या दशकात ब्राऊन शुगर अर्थात गर्दच्या विळख्यात तरुणाई अडकली. आता त्याची जागा मेफेड्रोनने घेतली आहे. आकर्षण, मित्रमंडळींचा आग्रह, पालकांनाच सेवन करताना पाहणे, प्रतिष्ठेचे लक्षण, हिरोगिरी आणि ‘हे आता सर्वमान्य आहे,’ हा समज अशा कारणांनी अमली पदार्थ सेवन करण्याकडे तरुणाई वळत आहे. साखरेप्रमाणे दिसणारे, गंधहीन, चवहीन मेफेड्रोनची चटक तरुणाईला लागली आहे. पुणे, मुंबईत वास्तव्य करणारे काही नाजयेरियन नागरिक या तस्करीत गुंतले आहेत. मेफेड्रोनसह ‘एलएएसडी स्टँप’ची नशा करण्याचे प्रमाणही तरुणाईत वाढले आहे.

गेल्या तीन दशकांत काय बदलले?

पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगड पायथ्याजवळ डोणजे गावात सुमारे २० वर्षांपूर्वी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत पुणे- मुंबईतील तरुण-तरुणी सामील झाले होते. रेव्ह पार्टी म्हणजे काय हा प्रकार तेव्हा सर्वसामान्यांना माहीत नव्हता. या पार्टीत सापडलेले अमली पदार्थ आणि त्यांचे सेवन करणारे विशी-पंचविशीतील तरुण हा त्या वेळी पुण्यात मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात असे काही होणे त्या वेळी नवीन होते. त्याच्या कारणांचा पाठपुरावा करताना बदललेल्या पुण्याचे चित्र समोर आले.

हेही वाचा >>> ठाणे : लक्ष्य शाळकरी मुले!

पुणे शहर आणि परिसरात साधारण अडीच दशकांपूर्वी आयटी पार्कच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या. देशभरातील तरुण-तरुणी नोकरीनिमित्ताने बाणेर, बालेवाडी, कल्याणीनगर, विमाननगर, पिंपळे सौदागर, बावधन आदी भागांत वास्तव्य करून राहिले. त्यांना मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगारात मूलभूत गरजांबरोबरच मनोरंजनासाठी निरनिराळ्या मार्गांचा अवलंब करणे सहज शक्य होऊ लागले. ‘नवीन’ अनुभव घेण्यास उत्सुक अशा ‘ग्राहकां’साठी पब, रेस्टॉरंट, मद्यालयांचे पेव फुटले. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगू लागल्या. मोठ्या आवाजातील संगीत, त्यावर बेधुंद होऊन नृत्य आणि त्यातून मिळणारा आनंद तरुणाईला हवाहवासा वाटू लागला. पुण्याच्या परिघावर डान्स बार सुरू झाल्याचा काळही साधारण हाच. या मनोरंजनाची ‘नशा’ आणखी वाढविण्याच्या दृष्टीने अशा पार्ट्या, स्नेहसंमेलनांत अमली पदार्थांचा शिरकाव सुरू झाला.

कॅम्प, कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर या विशेषत: पुण्याच्या परिघावर असलेल्या भागांमधील रात्र आणि रात्रोत्तर जीवन तरुणाईत लोकप्रिय होऊ लागले. यातील अनेक पब आणि बारमध्ये होणाऱ्या पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमांच्या जोडीला मद्याबरोबरच अमली पदार्थांची जोडही सहज मिळू लागली. अमली पदार्थांचे सेवन, मद्यापार्ट्यांचे पेव पुण्यात फुटले. या पार्ट्यांमुळे रहिवाशांना होणारा त्रास, पार्ट्यांनंतर होणारी भांडणे, छेडछाडीचे प्रकार हेही सर्व होतच होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर या सगळ्याचा कडेलोट होऊन सामान्य पुणेकराच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यानंतर लगेचच एल थ्री बारमधील पार्टीमुळे पुण्यातील रात्र जीवनाचे भीषण वास्तवही समाजासमोर आले.

अमली पदार्थ येतात कुठून?

मुंबई, पुणे, बेंगळूरु, चंडीगड, दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांत अमली पदार्थ तस्करांनी त्यांचे जाळे उभे केले आहे. गेल्या वर्षी पुण्यात अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारांकडून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर तरुणांमधील नशेखोरी चर्चेत आली होती. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांकडून मेफेड्रोनला सर्वाधिक मागणी आहे. त्या खालोखाल गांजा, चरस, कोकेन, ब्राउन शुगर, अफू अशा अमली पदार्थांची विक्री शहरातील उच्चभ्रू भागांत होते. यातील काही पदार्थ तर पानटपरीवरदेखील मिळतात. या धंद्यात काही इराणी तस्करही सामील असल्याचे बोलले जाते. अमली पदार्थांचे काही व्यवहार तर समाजमाध्यमांवरही होतात. विशिष्ट सांकेतिक नावांनी या पदार्थांची विक्री केली जाते. उदाहरणार्थ, मेफेड्रोनला सांकेतिक भाषेत ‘म्याऊ, म्याऊ’ असे म्हटले जाते. पुण्यात विकी व्यवहारांबरोबरच अमली पदार्थांचे उत्पादनही होत असल्याचे उघडकीस आले आहे. मध्यंतरी पुण्याजवळील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत तयार करण्यात आलेले मेफेड्रोन थेट दिल्लीतून कुरिअरद्वारे लंडनला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर देशपातळीवरील तपास यंत्रणांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. मेफेड्रोन तस्करीत आंतराष्ट्रीय पातळीवरील बडे तस्कर गुंतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पुण्यात मेफेड्रोन तस्करांचे जाळे

पुण्यातील कोंढवा, विमाननगर, कोरेगाव पार्क, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अमली पदार्थांची विक्री केली जाते. अमली पदार्थांची नशा महाग असते. पुण्यात नोकरीसाठी आलेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण, तसेच शिक्षणानिमित्त आलेले विद्यार्थी अमली पदार्थ विक्रेत्यांचे मुख्यत: सावज असतात. उच्चभ्रू भागातील हॉटेल, पबच्या बाहेर अमली पदार्थ विक्रेत्यांचा वावर असतो. एक ग्रॅम मेफेड्रोनची किंमत पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत असते.

तपास यंत्रणांसमोर आव्हान

मेफेड्रोन निर्मिती आणि तस्करीने देशभरातील तपास यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमली पदार्थ तस्करी प्रकरण उघडकीस आणले. पुणे, सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्याोगिक वसाहत, सांगली, दिल्लीत छापे टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. आरोपींनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन उत्पादन, साठा, वितरण केले आहे. या प्रकरणात पुण्यातील अमली पदार्थ तस्कर हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले पैसे दिल्लीतील वीरेन सिंग, संदीप धुनिया यांना पाठविल्याचा संशय असून त्याबाबत तपास करण्यात येत आहे. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा तपास अमली पदार्थविरोधी विभागाकडे (एनसीबी) नुकताच सोपविण्यात आला. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास करण्यात येत आहे. मेफेड्रोन तस्करीतील पैसे हवालामार्फत पाठविण्यात आल्याने ‘ईडी’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन समांतर तपास सुरू केला.

तज्ज्ञ काय म्हणतात?

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांच्या मते, ‘अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा वयोगट आता १७ व्या वर्षापर्यंत कमी झाला आहे. ‘मुक्तांगण’मध्ये महिनाभरात या वयोगटातील दहा ते बारा जण येतात. त्यात सर्व आर्थिक स्तरांतील तरुणांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. अमली पदार्थ सेवन केल्याने आनंद मिळतो, दडपण कमी होते, असे अनेक गैरसमज असतात. त्यातून मुले अशा पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यातही अल्पवयीन मुलांमध्ये गांजा या अमली पदार्थाचे सर्वाधिक व्यसन आढळून येत आहे. त्या खालोखाल मेफेड्रोन (एमडी) हा पदार्थ आहे. सहज उपलब्धतेमुळे मुले अमली पदार्थांचे सेवन करतात, असे निरीक्षण आहे.’ ज्येष्ठ समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मकरंद ठोंबरे यांचे याबाबतचे निरीक्षणही बोलके आहे. ते सांगतात, ‘पूर्वी मुंबईसारखे महानगर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मुलांमध्ये अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण फार नव्हते. गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण झपाट्याने वाढले. केवळ उच्चभ्रू वर्गात अमली पदार्थांचे सेवन होते असा समज असतो. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. समाजमाध्यमांतून अमली पदार्थांविषयी मिळणारी माहिती, त्यातून निर्माण होणारे आकर्षण याचा मोठा पगडा आहे. त्याचप्रमाणे मित्र-पालक अमली पदार्थ सेवन करतात, त्यामुळे सवय लागायला अशीही कारणे आहेत. अमली पदार्थांची सहज उपलब्धता, कायद्याचा न राहिलेला धाक, ‘सो व्हॉट अॅटिट्यूड’, पैशांच्या जोरावर काहीही मॅनेज करता येते, हे दृष्टिकोन तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढून नेत आहेत. समाज म्हणून खडबडून जागे होण्याची हीच वेळ आहे.’

rahul.khaladkar@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pub case nightlife in pune city under the influence of drugs zws
Show comments