छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही भटक्या विमुक्त जमातींचे दैन्य संपलेले नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना अजून बराच काळ लागणार आहे. अठरा विश्वे दारिद्र्याच्या जोडीला रोजगाराच्या अभावाचा, रोजगाराच्या अपुरेपणाचा, व्यसनाधीनतेचा शाप… त्यामुळे दारिर्द्याची भीषणता अधिक भेसूर झाल्याचे दिसते. समाजातील या घटकाच्या उत्थानासाठी सरकारी उपाययोजना पुरेशा नसताना काही सामाजिक संस्था, कार्यकर्ते त्यासाठी धडपड करताना दिसतात. ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ त्यापैकीच एक महत्त्वाची संस्था आहे. त्यांना सढळ आर्थिक मदतीची गरज आहे.

मरगा तालुक्यातील मुळज रस्त्यावरील मसनजोगी वस्ती, जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये वडार वस्ती, निलंगा तालुक्यातील इनामवाडी येथील याच प्रकारची भटक्या विमुक्त जाती-जमातींची वस्ती… वस्त्या वेगवेगळ्या असल्या तरी तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात काही समान दुवे आहेत. त्यांच्या आयुष्याला स्थैर्य नाही, उज्ज्वल भविष्य नावाचा काही प्रकार असतो हेच अनेकांच्या गावी नाही. त्याची आस असणे तर दूरच राहिले. खरेतर अनेक योजना निघाल्यानंतरही पालावर राहणाऱ्या विविध जाती-जमातींमधील मंडळींना पुढं घेऊन जाणारी यंत्रणा कमकुवतच राहिली आहे असे खेदाने म्हणावे लागते. या समाजातील मुलांना तरी शिक्षणाच्या मदतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ ही संस्था गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे. संस्थेतर्फे राज्यभरात ५४ ठिकाणी अशा पालावरील शाळा सुरू आहेत.

मसनजोगी वस्तीसाठी सुवर्णाताईंचे प्रयत्न

उमरगा तालुक्यातील मुळज रस्त्यावर ५३ कुटुंबांची मसनजोगी वस्ती आहे. सकाळी चार वाजता टिकल्यांची पाकिटे, कंगवे, चहाची गाळणी अशा संसारोपयोगी पण स्वस्तातील वस्तू घेऊन विक्रीसाठी या वस्तीमधील महिला बाहेर पडतात. दुपारी १२ वाजेपर्यंत तालुक्याच्या गावात किंवा शहरातील एखाद्या वस्तीमध्ये वस्तू विकायच्या आणि आलेला पैसा संसारासाठी आणि व्यसनासाठी वापरायचा अशी नियमित रीत आहे. भविष्यात या चित्रामध्ये बदल घडवण्यासाठी सुवर्णा दूधभाते या कार्यकर्त्या या वस्तीमधील मुलांना शिकवतात. ही मुले घरात तेलगू बोलतात. त्यामुळे त्यांना मराठी शिकवायचे कसे, हा प्रश्नच होता. त्यावर उपाय म्हणून सुवर्णाताईंनी ‘इकडे ये’, ‘आंघोळ कर’, ‘हात धुऊन ये’, ‘एकापाठोपाठ एक रांगेत बसा’ अशा सूचना तेलगूमध्ये शिकून घेतल्या. मुले त्यांच्या वर्गात जमली की तेलगू आणि मराठी भाषेमध्ये दुवा सांधून त्या शिकवतात. त्यांच्या पालावरील शाळेत तीन ते सहा वयोगटातील २७ विद्यार्थी आहेत. सकाळच्या वेळेत शाळा भरते. आरोग्याच्या सवयी लावणे, समूहाने शिस्तीत वागण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करणे हा येथील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने खेळ, गाणी यांचा वापर केला जातो.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज

वडार वस्तीवरील रंजना हिवराळे यांचा संघर्ष

असेच दुसरे उदाहरण जालना जिल्ह्यातील परतूरमधील वडार वस्तीचे. वडार ही दगड फोडणारी जमात. पण आता दगड फोडण्याचे कामच फारसे शिल्लक नाही. दगड फोडणारी यंत्रे आली आणि वडार वस्तीतील मंडळींना त्यांचा व्यवसाय बदलावा लागला. यातील अनेक जण आता ऊसतोडणीला जातात. काही जण जलवाहिनी टाकण्याच्या कामावर जातात. ज्यांना काम नसते ती मंडळी दिवसभर पत्ते खेळत बसतात. एखाद्याला लहानपणीच दारू पिण्याचे व्यसन लागले तरी कोणाला त्यात काही गैर वाटत नाही. लहान मुलेही कधी पत्त्यांचा डाव मांडतील, हे सांगता येत नाही. अशा वातावरणात रंजना हिवराळे या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करतात. येथील मुले तेलगू, कानडी, मराठी अशी मिश्र भाषा बोलतात. त्यांना मराठीतून शिकविण्यासाठी त्यांचे शब्द आत्मसात करून शिकवावे लागते.

सोलापूर शहराला लागूनच ओतारी समाजाची वस्ती आहे. ही मंडळी पितळेच्या मूर्ती तयार करतात. वस्तीमध्ये शिक्षणाचा अभाव. त्यामुळे पुढे पडण्याचे सारे मार्ग खुंटलेले. अशा वस्तीमधील मुलांना शिकवण्याचं काम किरणताई ओतारी करतात. अशा अनेक जाती आहेत. दारासमोर ढोलक वाजवत डोईवर मरीआईचा गाडा ओढणाऱ्या मंडळींची मुले शिकतच नाहीत.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : वसा साने गुरुजींच्या विचारांच्या प्रसाराचा,राष्ट्र घडविण्याचा

सुशिक्षितसमाजातील दुर्लक्षित घटक

आपल्याच शहराभोवती तंबू टाकून राहणारी ही माणसं कोठून येतात, काय काम करतात, अशी मंडळी या अवस्थेत का आहेत, असे प्रश्न ना सरकारी यंत्रणेला पडतात ना पांढरपेशा समाजाला. यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या भटक्या-विमुक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पालावर शाळा सुरू करून मुलांना किमान शाळेची गोडी लागावी असा प्रयत्न सुरू केला आहे. भटक्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण अजूनही १५ टक्केच आहे. भटक्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी अनेक आयोग अस्तित्वात आले. पण या वस्त्यांमध्ये लाभ न देता येण्यामागील कारण त्यांच्याकडे कागदपत्रच नसतात हे आहे. अनेकांनी ‘आधार कार्ड’ काढलेले नाही. तशी ही मंडळी मतदारही नाहीत, त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवावे असे कोणा नेत्यालाही वाटत नाही. त्यामुळे समाजानेच पुढाकार घेऊन या क्षेत्रात काम करणे आवश्यक झाले होते.

पहिला प्रयोग यमगरवाडीमध्ये

‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ने तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे पारधी समाजातील मुलांसाठी पहिला प्रयोग केला. या प्रयोगातून या कामाची गरज अधोरेखित झाली. मुलांना हात धुणे, दात घासणे, अंघोळ करणे, केस कापणे या सवयी लावण्यासाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. यातील पारधी समाजाच्या भाळी तर गुन्हेगारीचा शिक्का. चोऱ्यांच्या गुन्ह्यांत वडील कारागृहात आणि आई मजुरीला अशी स्थिती. त्यामुळे या मुलांना शिकवताना त्यांचा भोवताल आधी लक्षात घ्यावा लागतो. वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलींचे प्रश्न निराळे आहेत. मासिक पाळीच्या वेळी न पाळली जाणारी स्वच्छता, त्यामुळे होणारे संसर्ग, त्याविषयीच्या अंधश्रद्धा अशी खोल गर्तेत जाणारी एक साखळीच तयार आहे. ही साखळी तोडण्याचे काम सुरू आहे.

या प्रयत्नांमुळे निलंगा तालुक्यातील इनामवाडीत आता बरेच बदल घडू लागले आहेत. तुळशीराम गरगटे सांगत होते, ‘मरीआई, वडार आणि डोंबारी समाजातील भटक्या व्यक्तींना एकत्र करून त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड बनवून घेतले. त्यांना हळूहळू बचतीची सवय लावली. आता १२०० चौरस फुटांचे भूखंड घेऊन त्यांचे बस्तान बसवले. या समाजातील ४० विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या वस्तीमधील एक वडार समाजातील मुलगी परिचारिका झाली आहे. पूर्वीचे दारू पिण्याचे प्रमाण आता ७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. वस्ती सुधारत आहे. या वस्तीमधील मुलींसाठी आता आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. ‘पालावरच्या शाळा’ हे परिवर्तनचे एक साधन म्हणून वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना मदतीची गरज आहे. या उपक्रमास शैक्षणिक साहित्याची मोठी गरज आहे. दानशुरांनी या कामांसाठी मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.

संस्थेचे काम कसे पाहता येईल?

राज्यभरात ५४ ठिकाणी पालावरच्या शाळा सुरू आहेत. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे भटक्या विमुक्त प्रतिष्ठानचे कार्यालय आहे. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून शेखर पाटील हे समन्वयक म्हणून काम पाहतात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे तर अभय शहापूरकर हे उपाध्यक्ष आहेत. तर विवेक आयाचित हे कार्यवाह आहेत. यातील शहापूरकर उपक्रमाचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी समन्वय करून ‘पालावरच्या शाळे’चे काम पाहता येईल. बहुतांश शाळा शहराबाहेरच्या पालावर काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी चालतात.

संस्थेपर्यंत कसे जाल

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे सुरू असणाऱ्या प्रकल्पापर्यंत आधी जाऊन तेथील कार्यकर्त्यांच्या मदतीने पालावरच्या शाळा पाहण्यास जाता येऊ शकते. या कामासाठी समन्वयक शेखर पाटील व डॉ. अभय शहापूरकर यांच्याशी संपर्क करावा. तुळजापूरपासून यमगरवाडी हा प्रकल्प २० किलोमीटरवर आहे.

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान

BHATKE V VIMUKT VIKAS PRATISHTHAN

ऑनलाईन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर

खाते क्रमांक : 084100107153

आयएफएससी कोड : COSB0000084

धनादेश येथे पाठवा…

पुणे कार्यालय

संपादकीय विभागएक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय

संपादकीय विभागप्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभागद इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभागप्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालयसंपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मेनशन, तनिष्क शोरूमच्या वरती, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२