Premium

इस्त्रोचं आणखी एक मोठं यश, चंद्राकडे पाठवलेलं यान पृथ्वीपर्यंत परत आणलं, आता अंतराळवीर…

इस्रोनं म्हटलं आहे की, चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.

propulsion module of Chandrayaan 3
इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम केला आहे. (PC : ISRO/X)

सतत नवनवी यशाची शिखरं सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एक मोठं यश मिळवलं आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. चांद्रयान-३ मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोचं चंद्रावरील संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोला आणखी एक यश मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रोने काही वेळापूर्वी माहिती दिली आहे की, “चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.” चांद्रमोहिमेतल्या या मोठ्या टप्प्याची माहिती देताना इस्रोने म्हटलं आहे की, “आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे.” चांद्रयान मोहीम पूर्ण करून चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. हे केवळ चांद्रयान मोहिमेसाठीचं मर्यादित यश नव्हे तर कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता सिद्ध करणारी कामगिरी आहे. त्यामुळे इस्रोला आता अंतराळात किंवा चंद्रावर अंतराळवीरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणं शक्य होईल.

चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल सध्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालत आहे. २२ नोव्हेंबर रोजी त्याने १.५४ लाख किलोमीटर अंतर पार केलं. प्रोपल्शन मॉड्यूलच्या उर्वरित प्रवासास १३ दिवस लागू शकतात. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आता या मॉड्यूलचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा असेल. या मॉड्यूलसाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे. जे सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

हे ही वाचा >> मिचौंग चक्रीवादळ पुढे सरकलं, ‘या’ राज्याला सर्वाधिक धोका; महाराष्ट्रात हवामान स्थिती काय?

इस्रोने ऑगस्ट २०२३ मध्ये जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अंतराळयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान-३ हे चंद्रावर संशोधन करत होतं. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवत होते. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर भारताचं प्रज्ञान आणि विक्रम निष्क्रिय झाले. कारण ही मोहीम पूर्णपणे सौरऊर्जेवर अवलंबून होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrayaan 3 mission propulsion module successfully back in lunar to earth orbit asc

First published on: 05-12-2023 at 13:12 IST
Next Story
डिसेंबरच्या ‘या’ तारखेला GTA 6 चा ट्रेलर येणार… ग्रँड थेफ्ट ऑटो ६ गेमच्या रिलीजची तारीख आणि त्यामध्ये कोणते नवीन बदल होणार ते पाहा