डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील रेतीबंदर छेद रस्ता ते सत्यावान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिर मैदानाजवळ कल्याण डोंबिवली पालिकेचे बगिचा आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून भूमाफियांनी खरेदीदारांची फसवणूक सुरू केली आहे, अशी तक्रार उमेशनगर मधील रहिवासी संजय वसंत म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंदराज, पालिकेच्या साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना देण्यात आल्या आहेत. शशिकांत सुरेश म्हात्रे, योगेश हरिश्चंद्र भोईर या भूमाफियांनी मधुकर शांताराम म्हात्रे, शरद शांताराम म्हात्रे यांच्या सहकार्याने या बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. ही बेकायदा इमारत पालिकेने यापूर्वी अनधिकृत घोषित केली आहे. बगिचा आरक्षणावरील ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी म्हणून आपण सतत पालिकेत पत्रव्यवहार करत आहोत. आपणास पालिकेच्या ह प्रभागा कार्यालयाकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात येऊन या बेकायदा इमारतीला अधिकारी पाठबळ देत आहेत, असे संजय म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठेकेदाराकडून लाच स्वीकारणारा कल्याण-डोंबिवली पालिकेचा कनिष्ठ अभियंता निलंबित

सात माळ्याच्या या बेकायदा इमारतीची पालिकेची बनावट बांधकाम कागदपत्रे, महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून उभारणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी पध्दतीने या इमारतीमधील सदनिका भूमाफिया घर खरेदीदारांना विक्री करत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.या बेकायदा इमारतीवर भुईसपाट करण्याची कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा आपण उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नेरुळ येथे तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत, ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली

या बेकायदा इमारतीपासून १०० फुटावर राहुलनगरमध्ये रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या दोन बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बेकायदा इमारतींवरही पालिकेकडून कारवाई केली जात नाही. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालून गावदेवी मंदिराजवळील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांची आणि राहुलनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या तिन्ही बेकायदा इमारती भुईसपाट करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आणि ह प्रभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. याविषयी उघड बोलले तर त्रास होईल या भीतीने कोणीही रहिवासी उघडपणे बोलत नाही.

देवीचापाडा गावदेवी मंदिर येथील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांनी उभारलेल्या बेकायदा इमारतीची माहिती घेतो. ही इमारत यापूर्वीच अनधिकृत म्हणून घोषित केली आहे की नाही याविषयी खात्री करतो. ही इमारत आरक्षित भूखंडावर उभी असेल तर आयुक्तांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्यात येईल. याशिवाय, राहुलनगरमधील दोन्ही बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे.-राजेश सावंतसाहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.