डोंबिवली – दहशतवाद्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांचा बळी घेतला. यामध्ये डोंबिवलीील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी गुरुवारी (ता.२४) डोंबिवली बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले आहे.दहशतवाद्यांच्याबाबतीत जनतेच्या जे मनात आहे, तेच होईल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे डोंबिवलीत अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मृत कुटुंबीयांच्या नातेवाईक सांत्वन करत असताना, कुटुंबीयांनी तेथे पर्यटक हिंदू की मुसलमान असे विचारून वेचून वेचून दहशतवाद्यांनी मारले. त्यांच्यापैकी कोणालाही सोडू नका. याप्रकरणी आपण कठोर कारवाई करा, असे उद्विग्न होऊन प्रश्न मुख्यमंत्र्यांना केले. असेच प्रश्न पीडित कुटुंबीयांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना केले. खासदारांनीही याप्रकरणी शासन कठोर भूमिका घेईल असे आश्वास्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठाजवळ उभे असतानाच मैदानातील संतप्त नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणा केल्या. नागरिकांच्या या उत्स्फूर्त घोषणांनी काही काळ वातावरण तप्त झाले होते. नागरिकांची घोषणाबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनतेला जे हव आहे तेच होणार, अशा शब्दात भावना व्यक्त करून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सांगितले.

तिन्ही पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना नागरिकांना शोक अनावर झाला. यावेळी संतप्त नागरिक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषण देत होते. माजी नगरसेवक राहुल दामले यांनी सर्व पक्षीय नेत्यांचे मत विचारात घेऊन डोंबिवली गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहशतवाद्यांचा समूळ बिमोड करायचा असेल तर आता नागरिकांनीही एकजुटीने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत होत्या.

नागरिकांचे आंदोलन

भागशाळा मैदानात अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना डोंबिवली रेल्वे स्थानक भागात नागरिकांनी एकत्र येत दहशतवादी आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला. दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावत आहेत. राजकारणी लोक एकमेकांच्या खुर्च्या ओढण्यात मग्न आहेत. त्यांना जनतेच काही पडलेले नाही. हल्ल्यानंंतर सगळे जण हल्ला विसरून जातील पुन्हा राजकारणी आपले जुने खुर्च्या ओढण्याचे प्रकार सुरू करतील, अशी संतप्त भावना एका जाणती महिला खुलेआमपणे व्यक्त करत होती. नागरिकही या महिलेला पाठिंबा देऊन दहशतवादी हल्ला म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे, अशा प्रतिक्रिया देत होते. दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी नागरिकांच्या हातात कायदा द्या. त्यांना शस्त्रे द्या, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

डोंबिवली पूर्वेत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्या उपस्थितीत हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli shuts down on thursday to protest pahalgam terror attack amy