कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचे २६ वे आयुक्त म्हणून बुधवारी दुपारी अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारला. शहर विकासाची कामे मार्गी लावताना भविष्यवेधी प्रकल्प राबविण्याकडे आपला भर असणार आहे, अशी माहिती नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी पदभार स्विकारताना माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिका मुख्यालयात आयुक्त दालनात आयुक्त गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात यापूर्वी प्रशासकीय काम केले आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्थानिक महापालिकांशी आपला संबंध आला. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागात कोणते प्रश्न असतात याची आपणास जाणीव आहे. कल्याण डोंबिवलीतील प्रश्न सोडवण्याकडे आपला भर असणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

शहरे वाढत असतात. त्यामुळे नागरिकरणाचा विचार करून येत्या ३० ते ४० वर्षातील शहराच्या गरजा ओळखून भविष्यवेधी प्रकल्प राबविण्याकडे आपला भर असणार आहे. कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीत एमएमआरडीएचे तसेच स्मार्ट सिटी, पाणी योजना असे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची माहिती घेऊन हे प्रकल्प विहित वेळेत गतिमानतेने कसे पूर्ण होतील याकडे आपले बारकाईने लक्ष असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या लोकाभिमुख कार्यक्रमाचा भाग म्हणून नागरिक केंद्रीत तक्रारी तत्परतेने मार्गी लागतील यासाठी आपला प्रयत्न असेल. याशिवाय प्रशासकीय गतिमानतेसाठी काही नवीन पध्दत विकसित करता येते का हे तपासले जाईल. लोकाभिमुख प्रकल्प राबविताना कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून घेता येईल का याचीही चाचपणी केली जाईल. नागरिकांना तत्पर, गतिमानतेने सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, असे आयुक्तांनी सांगितले.

पालिका हद्दीतील पाणी पुरवठा योजना, कचरा प्रकल्प, शिक्षण, आरोग्य हे थेट नागरिकांशी निगडित विषय असतात. त्यामुळे या विभागांचे सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावणे, शाळांचे बळकटीकरण, वैद्यकीय विभाग सुसज्ज करणे या विषयांना आपले प्राधान्य असेल. दर दोन महिन्यांनी सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन तो विहित वेळेत कसा पूर्ण होईल याकडे लक्ष दिले जाईल. आपण स्वतः स्थापत्य अभियंता आहोत. काही तांत्रिक बाजुचे अडथळे दूर करून ते प्रकल्प गतिमानतेने पूर्ण करण्याकडे आपला कल असेल, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त संजय जाधव उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information from commissioner abhinav goyal regarding projects of development amy