डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहर परिसरात अनेक खासगी सुरक्षा रक्षक खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेतनावर काम करतात. काही खासगी सुरक्षा एजन्सी आपल्या आस्थापनेवरील तैनात सुरक्षा रक्षकांना अनेक महिने वेतन देत नाहीत. वेतन मिळेल या आशेने सुरक्षा रक्षक काम करतात. नंतर खासगी सुरक्षा एजन्सी अशा सुरक्षा रक्षकांची दखल घेत नसल्याने सुरक्षा रक्षक एजन्सी सोडून देतात. अशाप्रकारे खासगी सुरक्षा रक्षकांची पिळवणूक करणाऱ्या दोषी खासगी सुरक्षा एजन्सींवर कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डोंबिवलीतील शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद थरवळ यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे.

काही खासगी सुरक्षा एजन्सींनी सुरक्षा रक्षकांकडून काम करून घ्याचे आणि नंतर त्याला वेतन न देता काम सोडण्यास भाग पाडायचे, असा प्रकार सुरू झाला आहे. अशी काही उदाहरणे शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली आहेत. कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील औद्योगिक विभाग, मोठी गृहसंकुले, खासगी आस्थापना, उद्याने, बगिचे, धर्मस्थळे अशा अनेक ठिकाणी काही खासगी सुरक्षा एजन्सी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करतात. या सुरक्षा रक्षकांचे वेतन नियुक्त करणारी आस्थापना, कंपनी थेट सुरक्षा एजन्सीच्या बँक खात्यावर जमा करते किंवा त्यांना सर्व सुरक्षा रक्षकांच्या एकत्रित वेतनाचा धनादेश दिला जातो.

या रकमेचे वाटप करण्याचे काम सुरक्षा एजन्सीच्या प्रमुखावर असते. अलीकडे काही सुरक्षा एजन्सी मूळ मालकांकडून आपल्याकडील सुरक्षा रक्षकांचे वेतन ताब्यात घेतात. ते वेतन सुरक्षा रक्षकांना दोन ते चार महिने वाटप करत नाहीत. आपणास एक दिवस तरी वेतन मिळेल या आशेवर सुरक्षा रक्षक उसनवारी करून घरगाडा चालवितो. अंगावरील कर्ज, उसनवारीचा डोंगर वाढत गेला की तो कोठुन फेडायचा, असा प्रश्न निर्माण झाल्यावर मग, काही सुरक्षा रक्षक त्या सुरक्षा एजन्सीचे काम सोडून देतात आणि अन्य ठिकाणी मिळेल त्या कामासाठी जातात. त्या एजन्सीमध्ये केलेला पगार कधीच मिळत नाही किंवा दिला जात नाही. असा अन्याय झालेला खासगी सुरक्षा रक्षक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला की त्याच्या तक्रारीची दखल स्थानिक पोलीस ठाणी दखल घेत नाहीत, असे ज्येष्ठ कार्यकर्ते थरवळ यांनी पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या निदर्शनास आणले आहे.

डोंबिवलीत अलीकडे एक ते दोन प्रकार घडल्याचे आणि ते सुरक्षा रक्षक आपल्याकडे यासंदर्भातची तक्रार घेऊन आले होते, असे थरवळ यांनी सांगितले. बहुतांशी खासगी सुरक्षा रक्षक हे गिरण्या, कंपन्या बंद पडल्याने नोकरीचे साधन म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. काही जण गावखेड्यातून नोकरीच्या आशेने शहरात येऊन सुरक्षा रक्षकाची कामे करत आहेत. मिळणारे वेतन वेळेत मिळत नसल्याने खासगी सुरक्षा रक्षकांमध्ये नाराजी आहे. अशीच परिस्थिती वाहतूक विभागात वाहतूक सेवक म्हणून काम करणाऱ्या सेवकांची आहे. पोलीस उपायुक्तांनी अशा अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी दाखल करून घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.