वसई: रविवारी महावीर जयंती निमित्त शहरातील चिकन, मटण आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश वसई विरार महापालिकेने दिले आहे. याविरोधात वसईतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. खाटीक संघटनेने बंदी झुगारून दुकाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे, तर महाराष्ट्र एकीकरण समितीने हा निर्णय नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.

रविवार २१ एप्रिल रोजी महावीर जयंती निमित्ताने शहारतील चिकन आणि मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश वसई विरार महापालिकेने दिले आहेत. नगर विकास विभागाच्या २००९ च्या शासन परिपत्रकानुसार हे आदेश काढण्यात आले आहे. जैन धर्मियांत भगवान महावीर यांना आदराचे आणि पूज्य स्थान आहे. त्यांनी अहिंसेचा उपदेश केला होता. त्यामुळेच या दिवशी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून या दिवशीचे पावित्र्य राखले जावे म्हणून मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

हेही वाचा :वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

खाटीक संघटना आक्रमक, दुकाने चालूच ठेवणार

पालिकेचा हा निर्णय एका विशिष्ट धर्मियांचे लांगुलचालन करणारा आहे. आम्ही बंदी असली तरी आमची चिकन मटण विक्रीची दुकाने सुरूच ठेवणार असे हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेने म्हटले आहे. आमच्या घरात, आमच्या गावात, आमच्या राज्यात, आमच्या देशात आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने खाद्य संस्कृतीतून दिला आहे. मग त्या अधिकारावर गदा आणण्याची हिंमत म्हणजेच संविधानाचा अपमान असून अशी मटणाचे दुकान बंद करणारी नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी खाटीक संघटनेने केली आहे. या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी खाटीक समाज रस्त्यावर उतरून यांच्या मुख्यालयांसमोर बकऱ्यांच्या वजड्या फोडून निदर्शन करेल असा अशारा हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे (महाराष्ट्र राज्य) प्रदेश कार्यध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांनी दिला आहे.

हेही वाचा : टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू

निर्णय नियमबाह्य असल्याचा आरोप

पालिकेच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे. या निर्णयाविरुद्ध मराठी एकीकरण समिती, आक्रमक झाली आहे. ज्या नियमाचा संदर्भ देऊन पालिकेने सदर मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढली आहे. तो नियमच मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेला असल्याने पालिकेचा हा निर्णयच नियमबाह्य असल्याचा दावा समितीने केलेला आहे. आमचा कोणाच्याही सणाला विरोध नाही पण स्वतःचे सण साजरे करताना इतरांच्या खाण्यापिण्यावर बंदी आणणे ही सण साजरी करायची कोणती पद्धत आहे ? मराठी माणसे संकष्टी,आषाढी किंवा इतरही सण साजरे करताना असे फतवे काढतात का ? असा सवाल महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. १ ते २% लोकांसाठी इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का ? तसेच ‘रविवार’ या मांसाहारच्या दिवशीच बंदी आणल्याने मांस दुकानदार बांधव, कोळी भगिनी यांना नुकसानभरपाई पालिका देणार का? असे अनेक प्रश्नही समितीने उपस्थित केले आहेत. आम्ही शासनाच्या सुधारीत नियमानुसारच बंदीचा निर्णय लागू केल्याची माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.