भारतीय जनता पक्षाने आज (१० एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. या यादीमध्ये पश्चिम बंगाल, चंदीगढ, उत्तर प्रदेश येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. पण भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. या चार विद्यमान खासदारांच्या जागेवर दुसऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे नेमके कोणत्या चार खासदारांचा पत्ता कट केला आणि त्या जागेवर कोणाला संधी देण्यात आली? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघातून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, प्रयागराजमधून (अलाहाबाद) नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मछलीशहरधून बी.पी.सरोज आणि गाजीपूरमधून पारस नाथ राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! लोकसभेसाठी भाजपा उमेदवारांची दहावी यादी जाहीर, कोणाला कोणत्या मतदारसंघातून संधी?

कोणाचे तिकीट कापले?

उत्तर प्रदेशमधील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केसरीदेवी पटेल यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याजागेवर आता प्रवीण पटेल यांना संधी देण्यात आली आहे. तसेच प्रयागराजमधून (अलाहाबाद) विद्यमान खासदार रिता बहुगुणा जोशी यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्या जागी नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली. बलिया मतदारसंघाचे विद्यमान खासदार वीरेंद्र सिंह मस्त याचे तिकीट कापून नीरज शेखर यांना उमेदवारी दिली आहे. चंडीगढ़च्या खासदार किरण खेर यांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर आता संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे. महायुतीतील पक्षांमध्ये काही लोकसभेच्या मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे काही मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा कायम आहे.