Manmohan Sing : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही वेळापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा पंतप्रधान होते. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातला तारा निखळल्याची भावना लोकांच्या मनात आहे. दरम्यान त्यांच्या आणि सुषमा स्वराज यांच्या शेरोशायरीची आठवणही सगळ्यांना झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं होतं लोकसभेत?

पंधराव्या लोकसभेच्या वेळी काँग्रेसची सत्ता होती आणि भाजपा विरोधी पक्षात होता. त्यावेळी दिवंगत मंत्री सुषमा स्वराज आणि माजी दिवंगत मनमोहन सिंग यांच्यात शेरो-शायरी गाजली होती. ज्याची आठवण आज पुन्हा एकदा झाली आहे. या शेरोशायरीची चर्चा कायमच सुरु असते.सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेत्या होत्या त्यावेळी त्यांना म्हणजेच विरोधकांना उद्देशून त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी मिर्झा गालिब यांचा एक शेर सुनवला. हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है. यानंतर सुषमा स्वराज यांनी दोन शेर म्हणत मनमोहन सिंग यांना उत्तर दिलं.

हे पण वाचा- Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांचं उत्तर काय होतं?

सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की जेव्हा शेर एखाद्या व्यक्तीला, पक्षाला उद्देशून म्हटला जातो तेव्हा त्याचं उत्तर द्यायचं असतं. मी आज दोन शेर म्हणून मनमोहन सिंग यांना उत्तर देणार आहे. असं म्हणत सुषमा स्वराज म्हणाल्या “कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता” बशीर बद्र यांचा शेर म्हणत उत्तर दिल्यानंतर त्यांनी दुसरा शेर म्हटला. “तुम्हे वफा याद नहीं, हमें जफा याद नहीं, जिंदगी और मौत के दो ही तराने है, एक तुम्हे याद नहीं, एक हमें याद नहीं.” यानंतर संपूर्ण सभागृह खो-खो हसलं होतं.

मनमोहन सिंग यांनी पुन्हा वाचला शेऱ

सुषमा स्वराज यांनी दोन शेर ऐकवल्यानंतर पुन्हा जेव्हा मनमनोहन सिंग बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी इकबाल यांचा शेर म्हटला, “माना की तेरे दीद के काबिल नहीं हूँ मै, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो कर.” त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी हा शेर म्हटल्यावर पडदा पडला असं वाटलं होतं. मात्र सुषमा स्वराज यांनी लालू प्रसाद यादव यांना उत्तर देत आणखी एक शेर म्हटला.

सुषमा स्वराज यांचं तितक्याच ताकदीच्या शेर ने उत्तर

सुषमा स्वराज म्हणाल्या, “ना इधर-उधर की तू बात कर, ये बता की काफिला क्यूँ लुटा, हमें रहजनोंसे गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है.” दोन नेत्यांच्या शायरीने लोकसभा दणाणून गेली होती. सुषमा स्वराज यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. आज मनमोहन सिंग यांचीही प्राणज्योत मालवली. मात्र लोकसभेत दणाणलेली ही दोन दिग्गजांमधली शेरोशायरी देश कायमच लक्षात ठेवेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan sing and sushma swaraj shayri in loksabha unforgettable memories after manmohan sing death scj