कोलकाता : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी दुपारी हावडा येथील हावडा मैदान परिसरातील जीटी रोडवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. हे आंदोलक राज्य सचिवालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होते, या वेळी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार, पाण्याचे फवारे, अश्रुधुराचा वापरही करावा लागला. यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. या घटनेत हावडा पोलीस आयुक्तालयातील चंडीतला पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्मचारी जखमी झाले आहेत.

विद्यार्थी संघटना ‘पश्चिम बंगा छात्र समाज’ आणि फुटीर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना ‘संग्रामी जौथा मंच’ यांनी मंगळवारी ‘नबन्ना अभिजन’ रॅलीला विविध ठिकाणांहून सुरुवात केली. महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक सचिवालय ‘नबान्न अभिजन’मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एमजी रोड, हेस्टिंग्ज रोड आणि प्रिन्सेप घाटाजवळील संत्रागाछी आणि हावडा मैदानाजवळील भागात पोलीस आणि आंदोलकांत चकमक झाली. यात काही आंदोलक तसेच पोलीस जखमी झाले.

हेही वाचा >>> जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा; मथुरेतील घटना, १२०हून भाविक रुग्णालयात दाखल

आंदोलकांनी राज्य सचिवालयाकडे जाणाऱ्या बॅरिकेड्स पाडण्याचा प्रयत्न केला. ‘पोलिसांनी आम्हाला का मारहाण केली? आम्ही कोणताही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. मृत डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही शांततापूर्ण रॅली काढली होती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,’ असे एका महिला आंदोलक म्हणाल्या.

पोलिसांनी सांगितले, की आंदोलकांनी सचिवालय गाठण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. त्यामुळे हावडा पुलाच्या कोलकाता बाजूने आणि कोना एक्स्प्रेसवेवरील संतरागछी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर केला. संत्रागाछी येथे आंदोलकांनी पोलिसांवर विटा फेकल्या यात अनेक अधिकारी जखमी झाले. आंदोलकांनीही पोलिसांच्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा केला आहे.

भाजपकडून आज बंदची हाक

मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये १२ तासांच्या बंदची हाक दिली. ‘ही निरंकुश राजवट नागरिकांच्या आवाजाकडे, मृत डॉक्टरला न्याय मिळवून देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्हाला संपाची हाक द्यावी लागली आहे. न्यायाऐवजी ममता बॅनर्जींचे पोलीस राज्यातील शांतताप्रिय नागरिकांवर लाठीमार करत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार म्हणाल्या.

शहर पोलिसाच्या पॉलीग्राफ चाचणीची मागणी

नवी दिल्ली/कोलकाता : डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉयचे जवळचे असलेले पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक अनुप दत्ता यांची पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी ‘सीबीआय’ने कोलकाता न्यायालयाकडे परवानगी मागितली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. दत्ता यांनी रॉयला हा गुन्हा लपवण्यात मदत केली का याचा शोध सीबीआय घेत आहे. रॉयने दत्ता यांना गुन्ह्याबद्दल सांगितले आणि त्यांना काही मदत मिळाली का हे शोधण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या मुद्द्यावर दत्ता यांची संमती घेतल्यानंतर पॉलीग्राफ चाचणीच्या अर्जावर न्यायालय निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

सीबीआय एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार

नवी दिल्ली : डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित ‘डीएनए’ आणि ‘फॉरेन्सिक’ अहवालांवर सीबीआय ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (एम्स) तज्ज्ञांचा सल्ला घेईल, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआय या प्रकरणात त्यांचे मत जाणून घेण्यासाठी अहवाल एम्सकडे पाठवेल, असे ते म्हणाले. गुन्हा करणारा फक्त संजय रॉय हाच आरोपी होता, की इतरही त्यात सहभागी होते, हे या अहवालांमुळे सीबीआयला तपासण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.