Pegasus Spyware: संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही…”

इस्राईलसोबत १५ हजार कोटींचा करार झाला होता तेव्हा हे सॉफ्टवेअरही विकत घेतल्याचा दावा करण्यात आलाय.

Raut Modi pegasus
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकावर साधला निशाणा

इस्राईलमधील एनएसओ (NSO) या खासगी कंपनीने विकसित केलेल्या पेगॅसस स्पायवेअरचा (Pegasus Spyware) राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी न्यायपालिकेतील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी वापर केला जात असल्यासंदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना, सध्याची परिस्थिती ही आणीबाणीपेक्षा भयंकर आहे असं सांगतानाच लोकशाही कुठं आहे?, असा प्रश्न उपस्थित केलाय.

आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पेगॅसससंदर्भात करण्यात आलेल्या नवीन खुलाश्यांच्या आधारे प्रश्न विचारण्यात आला. न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या वृत्तामध्ये दावा केलाय की मोदी सरकारने २०१७ मध्ये पेगॅसस हे सॉफ्टवेअर विकत घेतलं. इस्राईलसोबत १५ हजार कोटींचा करार झाला होता तेव्हा हे सॉफ्टवेअरही विकत घेतलं होतं, असं पत्रकारांनी विचारलं असता राऊत यांनी आम्ही याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला बोलू दिलं नाही असा आरोप केंद्र सरकारवर केलाय.

“आम्ही सगळे जे सांगत होतो त्यात…”
“या विरोधात सातत्याने आम्ही संसदेमध्ये आणि बाहेरही आवाज उठवत आलोय. देशात प्रमुख पत्रकारांचे, राजकारण्यांचे इतकच कशाला दोन केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पाळतीवर ठेवलं होतं. पेगॅससचं पोलखोल झालेलं आहे. यापेक्षाही वेगळे पुरावे आम्ही संसदेत देण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला बोलू दिलं नाही. संसदेचं कामकाज चालू दिलं नाही या विषयावर. न्यूयॉर्क टाइम्सनं केलेला खुलासा आणि राहुल गांधीसह आम्ही सगळे जे सांगत होतो त्यात सत्य आणि तथ्य आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे,” असं राऊत म्हणालेत.

नक्की वाचा >> “करदात्यांचे १५ हजार कोटी मोदी सरकारने राजकीय हेरगिरीसाठीच्या पेगसेस स्पायवेअरवर खर्च केले”

“आमचं संभाषण ऐकलं जातंय”
“उद्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा सरकार आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही प्रश्न विचारु म्हणून सरकारच्यावतीने संसद चालू दिली जाणार नाही. आमच्यासारख्या हजारो लोकांचे फोन हे त्यांच्या पाळतीखाली आहे. आमच्यावर पाळत ठेवली जातेय. आमचं संभाषण ऐकलं जातंय. माझ्या माहितीनुसार आमच्या सर्वांच्या बँक खात्यांसंदर्भात लहान व्यवहारांची माहिती घेतली जातेय. म्हणजे एक प्रकारे आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती सध्या देशात आहे. लोकशाही कुठं आहे?,” असंही राऊत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

वृत्तात काय म्हटलंय?
भारत सरकारकडून अधिकृतपणे पेगॅससची खरेदीची कबुली देण्यात आलेली नाही. मात्र न्यूयार्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. विशेष म्हणजे पेगॅसस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मधील इस्राईल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यूयार्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pegasus spyware issue sanjay raut slams modi government says there is no democracy scsg

Next Story
Pegasus Row : मोदी सरकारचं खोटं बोलणं पकडलं गेलं, सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल : मल्लिकार्जून खरगे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी