Premium

‘रस्त्यावर, गटारात, सभागृहात… जिथे जिथे भाजपा, तिथे त्यांच्याशी संघर्ष करणार’, महुआ मोईत्रा भाजपवार बरसल्या

लोकसभेतून बडतर्फ केल्यानंतर महुआ मोईत्रा म्हणाल्या की, जी आचारसंहिता अस्तित्वातच नाही, त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मला दोषी ठरविले गेले आहे. लोकसभेमध्ये सर्व खासदार जी पद्धत वापरतात, त्यासाठी नीतिमत्ता समिती मला शिक्षा देत आहे, हे अजबच आहे.

tmc-mp-mahua-moitra-expelled
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना बडतर्फ केल्यानंतर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. (Photo – ANI)

Mahua Moitra Expelled from Lok Sabha : तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या, खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेमधून अखेर बडतर्फ करण्यात आले आहे. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप भाजपा खासदाराने केल्यानंतर मोईत्रा यांची नीतिमत्ता समितीकडून चौकशी करण्यात आली. नीतिमत्ता समितीने आज (८ डिसेंबर) आपला अहवाल लोकसभेला सादर करून मोईत्रा यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस केली. बडतर्फीचा निर्णय झाल्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभा सभागृहाच्या बाहेर येऊन सरकारवर जोरदार टीका केली. मला लोकसभेतून बाहेर काढण्यासाठी नीतिमत्ता समितीने नियमांची मोडतोड करून आपला अहवाल तयार केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> “पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”

महुआ मोईत्रा म्हणाल्या, “लोकसभेने संसदीय समितीचा हत्यारासारखा वापर केला. विशेष म्हणजे, नीतिमत्ता समितीची स्थापना हे सदस्यांनी नैतिकता पाळावी यासाठी केली होती. मात्र या समितीचा गैरवापर केला जात असून जे करायला नको, ते या समितीला करायला लावले जात आहे. विरोधकांना बुलडोझर खाली चिरडून नेस्तनाबूत करण्यासाठी या समितीचा वापर केला जात आहे.” मोईत्रा यांनी यासाठी ‘ठोक दो’ या शब्दाचा वापर केला. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना ठोकले जात आहे, असे त्यांना म्हणायचे होते.

“मोदी सरकार मला शांत करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. अदाणी विषयावरून हा गोंधळ सुरू झाला. उद्या कदाचित सीबीआय माझ्या घरी धडकू शकते, पुढचे सहा महिने मला त्रास दिला जाऊ शकतो. पण अदाणींनी केलेल्या १३ हजार कोटींच्या कोळसा घोटाळ्याचे काय झाले? याचे उत्तर आम्हाला हवे. सीबीआय आणि ईडी यांनी त्या प्रकारात काहीच हस्तक्षेप केला नाही. मी फक्त पोर्टलचे लॉगिन शेअर केले हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होतो का? अदाणी यांनी तर देशातील सर्व बंदर, विमानतळ विकत घेत आहेत. अदाणी यांच्या कंपनीत परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा आहे आणि अदाणी यांच्या खरेदीला केंद्र सरकार एकामागोमाग एक परवानगी देत सुटले आहे. देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा अदाणी यांच्या हाती जात आहेत”, अशी घणाघाती टीका मोईत्रा यांनी केली.

हे ही वाचा >> “लोकसभेत माझे प्रश्न मी विचारत नाही”, महुआ मोईत्रांवरील कारवाईनंतर जेडीयू खासदाराचं वक्तव्य; ओम बिर्लांकडून कारवाईचा इशारा

“भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी तर भर सभागृहात मुस्लीम खासदार दानिश अली यांना अश्लाघ्य शिवीगाळ केली. लोकसभेतील २६ मुस्लीम खासदारांपैकी दानिश अली एक आहेत. देशातील २०० दशलक्ष मुस्लीम लोकसंख्या आहे, पण भाजपाच्या ३०३ खासदारांमध्ये एकही मुस्लीम खासदार नाही. दानिश अली यांना शिवीगाळ झाली, भाजपाने काही केले नाही. तुम्ही अल्पसंख्याकांचा द्वेष करता, महिलांचा द्वेष करता… पण ही नारीशक्ती तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मी ४९ वर्षांची आहे. मी पुढचे ३० वर्ष भाजपाशी लढा देईल. लोकसभेत, रस्त्यावर, गटारातही जिथे जिथे भाजपा आहे, तिथे तिथे मी भाजपाशी दोन हात करेल”, असे आव्हान मोईत्रा यांनी दिले.

भाजपाच्या अंताची ही सुरुवात आहे. जेव्हा मनुष्याचा नाश जवळ येतो, तेव्हा पहिल्यांदा विवेक मरतो, या वाक्याची त्यांनी पुनरावृत्ती केली.

कॅश फॉर क्वेरी प्रकरण काय होते?

मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. एवढेच नाहीतर मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता. या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc mp mahua moitra expelled from loksabha announced that she will fight with bjp for the next 30 years kvg

First published on: 08-12-2023 at 19:44 IST
Next Story
“लोकसभेत माझे प्रश्न मी विचारत नाही”, महुआ मोईत्रांवरील कारवाईनंतर जेडीयू खासदाराचं वक्तव्य; ओम बिर्लांकडून कारवाईचा इशारा