Nashik Maruti Idol : नाशिकमध्ये पूर आला की प्रशासन आणि यंत्रणा सज्ज होतेच. मात्र एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे दुतोंड्या मारुतीच्या ( Nashik Maruti Idol ) मूर्तीला पाणी लागलं का? गेल्या वर्षी ‘गोदावरी’ नावाचा एक सिनेमा आला होता त्यात काम करणाऱ्या विक्रम गोखलेंच्या तोंडीही “मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?” असा संवाद सातत्याने होता. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला की आधी पाहिली जाते ती दुतोंड्या मारुतीची मूर्ती. मारुतीच्या पायाला पाणी लागलं की छातीपर्यंत आलं? गळ्यापर्यंत आलं? हे पाहिलं जातं. नाशिकच्या पुराची पातळी मारुतीच्या मूर्तीशी केव्हा जोडली गेली ते आपण आता जाणून घेणार आहोत.

दुतोंड्या मारुतीची मूर्ती कुठे आहे? इतिहास काय?

दुतोंड्या मारुतीची मूर्ती ( Nashik Maruti Idol ) ही नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेल्या रामकुंड परिसरात आहे. या मूर्तीला दुतोंड्या मारुती म्हटलं जातं कारण या मूर्तीच्या दोन्ही बाजूला मारुती आहे. पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती राम मंदिराच्या दिशेने हात जोडून उभी आहे. तर पश्चिम बाजूला जी मूर्ती ती हातात गदा घेऊन राक्षसाला पायाखाली चिरडणाऱ्या संकट मोचक हनुमानाची आहे. हा मारुती फार पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी काळात साडेपाच फूट उंचीचा होता. सध्या असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीची उंची ही ११ फुटांहून अधिक आहे. १९३९ मध्ये जो पूर आला त्यावेळी दुतोंड्या मारुतीची ( Nashik Maruti Idol ) मूर्ती बुडाली. तसंच नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागलं, सराफ बाजार परिसरात पाणी गेलं आणि बोहरपट्टीही पाण्याखाली गेली होती. या पुरात दगडी मारुतीची मूर्ती भंगली.

हे पण वाचा- Nashik Rain : नाशिकमध्ये तुफान पाऊस, गोदावरी नदीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी; यलो अलर्ट जाहीर

सध्याच्या मारुतीची मूर्ती १९४२ पासून

सध्या जी दुतोंड्या मारुतीची ( Nashik Maruti Idol ) मूर्ती नाशिकच्या रामकुंडावर आहे ती त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १९४२ मध्ये करण्यात आली आहे. दुतोंड्या मारुतीची पूर्वीकडे असलेली मूर्ती ही शंकर परदेशी यांनी तयार केली आहे तर पश्चिमेकडची मूर्ती नथुराम भोईर यांनी तयार केली आहे.

दुतोंड्या मारुतीची मूर्ती पुराशी कधीपासून जोडली गेली?

१९३९ चा पूर आला तेव्हापासूनच ही मूर्ती पुराशी जोडली गेली. पण पूर्वीची मूर्ती भंगली आणि त्यानंतर १९४२ पासून मारुतीची नवी मूर्ती रामकुंडावर उभारण्यात आली आहे. गंगापूर धरण हे १९५४ मध्ये बांधण्यात आलं. पावसाळ्यात येणारं पाणी कुठेही अडवलं जात नव्हतं त्यामुळे मारुतीची ( Nashik Maruti Idol ) ही भव्य मूर्ती आपोआप पुराशी जोडली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचा दुतोंड्या मारुती आणि गोदावरीचा पूर हे एक समीकरण होऊन बसलं. नाशिकचा पूर किती आहे ते पाहायचं असेल तर दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला कुठे पाणी लागलं आहे? हा प्रश्न नाशिककर विचारतातच. त्यावरुन नाशिककर पुराची तीव्रता ठरवतात. नाशिकचे प्रसिद्ध छायाचित्रकार नंदकुमार देशपांडे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताता ही माहिती दिली.