राज्यात मागील काही महिन्यांपासून चिकुनगुनियाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत एकूण ३ हजार ६४६ रुग्ण आढळले. एडीस इजिप्ती हा डास चावल्याने चिकुनगुनिया होतो. यंदा मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस, त्यानंतर त्यात पडलेला खंड आणि पुन्हा पडलेला पाऊस यामुळे निर्माण झालेले वातावरण हे एडीस इजिप्ती डासाची उत्पत्ती वाढण्यासाठी अनुकूल ठरते. त्यामुळे यंदा चिकुनगुनिया रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे  वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिकुनगुनिया म्हणजे काय?

चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा रोग रक्त शोषणाऱ्या संक्रमित डासांद्वारे पसरतो. या रोगाची लक्षणे डेंग्यूच्या तापासारखीच असतात. तीव्र स्वरूपाचा ताप, सांधेदुखी (संधिवात), तसेच पुरळ रुग्णांमध्ये दिसून येतात. डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केल्यावर या रोगाचे निदान होते.

निदान व उपचार काय?

चिकुनगुनियाच्या निदानासाठी रक्ताची तपासणी केली जाते. प्रतिपिंडाच्या (अँटिबॉडी) तपासणीतूनही चिकुनगुनियाचे निदान होते. इतर आजारांच्या चाचपण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या करतात. हा इतर व्हायरल तापाप्रमाणेच आपोआप बरा होणारा आजार आहे. या विषाणूविरोधात सध्या कुठलेही निश्चित औषध नाही. त्यामुळे रुग्णाच्या लक्षणानुसार औषध देऊन उपचार केले जाते. रुग्णाने आराम करावा. दुखण्यासाठी व तापासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे. भरपूर पाणी व पेये घ्यावीत. रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार किंवा हृदयविकाराच्या रुग्णाला आजार झाल्यास अधिक काळजी घ्यावी लागते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : शिक्षकांनी रजा घेऊन आंदोलन का केले?

महाराष्ट्रात रुग्णसंख्या किती?

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कायर्क्रम महाराष्ट्र राज्याच्या अहवालानुसार, यावर्षी १ जानेवारी २०२४ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात चिकुनगुनियाचे एकूण ३ हजार ६४६ रुग्ण आढळले. त्यापैकी शहरी भागांत सर्वाधिक रुग्ण नागपूर महापालिका (८५३ रुग्ण), बृहन्मुंबई महापालिका (३६६ रुग्ण), पुणे महापालिका (२६१ रुग्ण), कोल्हापूर महापालिका (१७२ रुग्ण) हद्दीत आढळले. तर ग्रामीण भागांत कोल्हापूर ग्रामीण (२२६ रुग्ण), पुणे ग्रामीण (२०४ रुग्ण), अमरावती ग्रामीण (१७९ रुग्ण), अकोला ग्रामीण (१४९ रुग्ण) आढळले.

मागील वर्षीच्या तुलनेत चार पट रुग्ण?

मागील वर्षी १ जानेवारी ते २८ सप्टेंबर २०२३ दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात चिकुनगुनियाचे ८९० रुग्ण आढळले होते. परंतु यंदा या काळात चार पटीहून जास्त म्हणजे ३ हजार ६४६ रुग्णांची नोंद झाली. तर मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात संपूर्ण वर्षात राज्यात १ हजार ७०२ रुग्ण नोंदवले गेले. त्यातही मागील दोन्ही वर्षी या आजारात एकही मृत्यूची नोंद नाही.

हेही वाचा >>> ऑक्टोबर हिटला संक्रमण काळ का म्हणतात? याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

रुग्णवाढीचे कारण काय?

नागपूरसह राज्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस पडला. काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा कमी-अधिक पाऊस पडत होता. हे वातावरण एडीस इजिप्ती डासांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्यात आढळणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची संख्या वाढली. नागरिकांकडील कुलर, कुंड्यांसह भांड्यातही डास वाढले. शहरातील मोकळ्या जागा एडीस इजिप्ती डासांना प्रजननासाठी पोषक ठरू लागल्या आहेत. हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात प्रजनन करतात. नागपूरसह इतरही आजार वाढलेल्या भागात मोकळ्या भागात हे डास वाढले. या डासांमुळेच राज्यातील अनेक भागात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले.

नवीन लक्षणे काय?

चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये थंडी वाजून ताप येणे, गुडघा, घोटा दुखणे, तीव्र सांधेदुखी, सांधे सुजणे किंवा सांध्यांची हालचाल वेदनादायी होणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अंगावर पुरळ येणे, मळमळ होणे, उलट्या येणे ही लक्षणे साधारणपणे आढळतात. उपचारानंतर एक आठवडा ते दीड महिन्यात ही लक्षणे जातात. यंदाच्या वर्षात मात्र अनेक रुग्णांमध्ये दीड महिन्यानंतरही हातापायात वेदना, चेहरा व नाकाच्या त्वचेवर काळे डाग, अशी लक्षणे दिसत आहेत. वेदनाही दीड महिन्याहून जास्त काळ राहत असल्याची माहिती विदर्भ ऑर्थोपेडिक्स सोसायटीचे (व्हीओएस) अध्यक्ष डॉ. सत्यजित जगताप यांनी सांगितली.

प्रतिबंधात्मक उपाय काय?

सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:च्या घरात किंवा त्याच्या शेजारी डास उत्पत्ती होणार नाही म्हणून काळजी घ्यावी. कुलर, भांडी, फुलदाण्या, टाकाऊ टायरसह इतर वस्तूंमुळे पाणी गोळा होऊ नये याची काळजी घ्यावी. डास चावण्यापासून स्वत:चे रक्षण करावे. एडीस इजिप्ती डास दिवसा चावत असल्याने संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याची गरज आहे. तर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांनीही वेगळी काळजी घ्यायला हवी. त्यानुसार चिकुनगुनिया उद्रेकाच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मोकळ्या भूखंडावर पाणी गोळा झाल्यास संबंधितावर कारवाई करावी. जेणेकरून येथे पुन्हा पाणी गोळा होणार नाही. सर्वत्र कीटकनाशक फवारणी करावी. घरोघरी तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून डास अळ्या आढळल्यास नष्ट कराव्या. चिकुनगुनियाचे रग्ण वाढलेल्या नागपूरसह इतरही भागात ही मोहीम सुरू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis reason why chikungunya cases rise three times more in maharashtra this year print exp zws