Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek History Significance छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु महाराजांचे राज्य अस्तित्त्वात येऊ नये यासाठी मुघल, आदिलशाह, कुतुबशाहआणि पोर्तुगीज या सर्वांचीच करडी नजर शिवाजी महाराजांवर होती. विशेषतः औरंगजेब हा शिवाजी महाराजांच्या भलताच मागावर होता. तरीही महाराजांनी आपल्या राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास शिवाजी महाराजांनी भाग पाडले. आपले राज्य निर्वेध झाले आहे, याची खात्री पटल्यावरच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले. मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य निर्माण करणे शिवाजी महाराजांना आवश्यक होते. आपल्या राज्यातील जनतेला सुखी करण्याचा संकल्प महाराजांनी सोडला होता. मुघलांच्या राज्यात जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची विटंबना आणि साधू संतांची अवहेलना होत होती. याच पार्श्वभूमीवर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. राज्य स्थिर झाल्यावर भावी काळात वारस निश्चित होण्यासाठी महाराजांना स्वतंत्र राजा घोषित करणे आवश्यक होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग होता. महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक दिग्गज अभ्यासकांनी आपल्या संशोधनात केले आहे. जदुनाथ सरकार, वा. सी. बेंद्रे, ग. भा. मेहेंदळे यांसारख्या मोठ्या इतिहासकारांचा यात समावेश होतो.

अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानीचे ठिकाण रायगड का निवडले? काय होते यामागील समीकरण?

प्र. न. देशपांडे त्यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या पुस्तकात यासंदर्भातील बखरीचा संदर्भ देतात. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये म्हटले आहे की, “महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणोन छत्र सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय जाहाला.”

राज्याभिषेक करून घेण्यामागे महाराजांचे दोन प्रमुख उद्देश होते. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून स्थान मिळणार होते. राज्याभिषेकाने त्यांच्या राज्याला मान्यता मिळणार होती आणि शत्रूलाही त्यांना राजा मानणे त्यांना भाग पडणार होते.

राज्याभिषेकाचे निश्चित झाल्यावर किल्ले रायगड हे ठिकाण राजधानीसाठी महाराजांनी निवडले. हिरोजी इंदुलकर या स्थापत्यविशारदाकडे रायगडावर राजमहाल, राण्यांचे- राजपुत्रांचे महाल, मंत्र्यांचे वाडे आणि इतर इमारती उभारून राजधानीचे वैभव उभारण्याचे काम सोपवले. तर राज्याभिषेकाचा मुहूर्त गागा भट्ट यांनी काढला होता. या निमित्ताने ‘राज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘तुलापुरुषविधी’ या दोन पोथ्या गागा भट्टांनी मुद्दाम तयार करून घेतल्या होत्या. १६७४ च्या प्रारंभी राजधानी रायगडावर राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू झाली. ६ जून ही तारीख राज्याभिषेकासाठी ठरली. असे असले तरी या समारंभाच्या विधींची सुरुवात ९ दिवस आधीच झाली होती.

२९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. या दिवशी महाराजांची मुंज आणि तुलापुरुषविधी करण्यात आला. डच कागदपत्रांमध्ये या तुलादान विधी समारंभाचे संदर्भ सापडतात. या संदर्भानुसार महाराजांचे वजन १६० पौंड भरले होते. या समारंभासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ११ हजार जण रायगडावर उपस्थित असल्याचे डच कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. यानंतर ३० मे रोजी महाराजांचे समंत्रक विवाह झाले. या समारंभासाठी इंग्रजांचा प्रतिनिधि हेन्री ऑक्झिंडेन या समारंभासाठी रायगडावर उपस्थित होता. त्याने हा विवाहाचा प्रसंग आपल्या रोजनिशीत लिहून ठेवला. परंतु त्याला या विधींमधील फारसे काही कळत नसल्याने त्याने शिवाजी महाराजांनी विवाह केला इतकीच नोंद केली. त्यामुळे महाराजांनी खास या समारंभासाठी नवा विवाह केला, असा गैरसमज निर्माण झाला. वास्तविक महाराजांनी आपल्या पत्नींशीच विवाहगाठ बांधली होती.

अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?

३१ मे रोजी ऐंद्रीशांतीचा मुहूर्त होता. या दिवशी अग्निप्रतिष्ठापना करण्यात आली. या दिवशी इंद्राणीची पूजा करण्यात आली. सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विजांना सुवर्ण दक्षिणा देण्यात आली.

१ जून रोजी ग्रहयज्ञ तर ३ जून नक्षत्र होम करण्यात आला होता.

४ जून रोजी निऋतीयाग झाला. प्र. न. देशपांडे (छत्रपती शिवाजी महाराज,२००२) यांनी नमूद केले आहे की, त्या प्रसंगी मांस, मत्स्य, मदिरा यांची आहुती देण्यात आली.

६ जून हा मुख्य दिवस होता. या दिवशी शिवाजी राजे सिंहासनावर बसले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. या समारंभाचे वर्णन सभासद बखरीत सापडते… ‘सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर ब्राह्मणाणी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलश पात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह, मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य नाही’.

हेन्री ऑक्झिडेन यांनी केलेली नोंद

हेन्री ऑक्झिडेन हा इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. त्याने राज्याभिषेकाच्या केलेल्या नोंदींमध्ये म्हटले आहे की, ‘या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाला. संभाजी राजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली एका ओट्यावर बसले होते.’ सिंहासनाचे वर्णन करताना तो लिहितो, ‘सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक आणि राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठ्या दाताच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे आणि एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळी लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.’

‘राज्याभिषेक शक’

राज्यारोहणप्रसंगी शिवाजी महाराजांनी नव शक किंवा कालगणना सुरु केली. या शकाला ‘राज्याभिषेक शक’ किंवा ‘राजशक’ असेही म्हणतात. मध्ययुगातील शककर्ता राजा म्हणून महाराजांचा गौरव केला जातो. या प्रसंगी महाराजांनी शिवराई होन हे सोन्याचे नाणे पाडले. या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपति अशी अक्षरे कोरलेली आढळतात. राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी ‘क्षत्रिय कुलावतांस श्री राजा शिवछत्रपती’ हे नवे बिरुद धारण केले. राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानमंडळाची रचना केली.

महाराजांचा दुसरा राज्याभिषेक

राज्याभिषेकाचा मोठा सोहळा पार पडल्यानंतर काही तंत्रमार्गी ब्राह्मणांच्या आणि साधूंच्या आग्रहामुळे शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा लागला, असे संदर्भ शिवापूरकर शकावली, शिवराज्य अभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये सापडतात. आ. ह. साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक, (२०००) या पुस्तकात महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.

महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला?

ज्येष्ठ महिन्यात झालेल्या मोठ्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच २४ सप्टेंबर १६७४ रोजी झाला अशी माहिती ‘शिवराज्य अभिषेक कल्पतरू’ नावाच्या संस्कृत ग्रंथातून मिळते. या ग्रंथांचा कालखंड अद्याप स्पष्ट नाही. हा ग्रंथ अनिरुद्ध सरस्वती या कवीने लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपूरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरुपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये प्रतापराव गुजर मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी झालेला जिजाबाईंचा मृत्यू या घटनांचा उल्लेख आहे. या ग्रंथात या राज्याभिषेकाचे विधि दिले आहेत. त्यात बळी सारख्या विधींचा समावेश आहे. सिंहासनाच्या सिंहांना बळी देऊन प्राण फुंकण्यात आले असे संदर्भ आहेत. यात लाल आसनावर लाल वस्त्र घालून तांत्रिक ब्राह्मणाने विधी केले असा उल्लेख आहे. यावरून असे लक्षात येते की तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधी श्रेष्ठ मानत असावेत.

शिवाजी महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेकाला मान्यता का दिली असावी याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. २४ सप्टेंबर १६७४ रोजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. परंतु या राज्यअभिषेकाचा विधि साध्या पद्धतीने पार पडला असावा. कारण याचे कोणतेही संदर्भ ब्रिटिश किंवा इतर परकीय साहित्यात सापडत नाहीत. सभासद, जेधे शकावली यात कोठेही या राज्याभिषेकाचा उल्लेख सापडत नाही.