कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयाची अपेक्षा असताना पराभव पदरी पडल्यानंतर महायुतीचे नेते लगेचच सतर्क झाले आहेत. शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी बुधवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली . यासंदर्भात मुंबईला जाऊन महायुतीच्या शीर्षयस्थ नेत्यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, अशोक सराटी आदी यावेळी उपस्थित होते. महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या प्रमुख प्रमुखांना एकत्रित येण्याची सूचना मुश्रीफ यांनी केल्यानुसार ही बैठक पार पडली.

हेही वाचा : हा तर जनतेचा विजय – शाहू महाराज, धैर्यशील माने यांच्या भावना

यावेळी मंडलिक म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्ते – नेत्यांनी चांगले काम केले आहे. आम्हाला कागल, चंदगड या दोन विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. प्रचार काळात माझ्याकडून गैर काही बोलले गेले असल्याचे वाटत नाही. आगामी काळात महायुती म्हणून काम केले जाईल. आत्मपरीक्षण करून आवश्यक तेथे सुधारणा केल्या जातील.

हेही वाचा : कोल्हापुरात शाहू महाराजांचा दीड लाखावर मताधिक्याने विजय, संजय मंडलिक पराभूत

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशभरात काही लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. केंद्रातील19 मंत्री पराभूत झाले आहेत. शक्तीपीठ महामार्ग, मराठा आंदोलन यासारखे काही मुद्दे तसेच काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विषयी जनमतातील आदर या कारणामुळे हा पराभव झाल्याचे दिसतो.