‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा…’ हा इंदिरा संत यांच्या विषयीचा नितांत सुंदर लेख वाचला; आणि कवितांमधून भेटणाऱ्या ‘इंदिरा संत’ पुन्हा नव्याने थोड्या जास्त कळल्या. ‘औक्षण’ , ‘शैला’, ‘बाभळी’ या आणि अशा कित्येक कवितांना शब्दांचं लेणं चढवून बाईंनी आशयसमृद्ध कविता लिहिल्या- ज्या आजतागायत काव्यरसिकांच्या काळजात घर करून आहेत. निसर्गाची किमया आपल्या शब्दांच्या जादूने सहजसुंदररीत्या बांधून ठेवण्याची नजाकत बाईंकडे होती. त्यांच्या स्नुषा डॉ. सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’ हे पुस्तकही वाचनीय आहे. त्यातही बऱ्यापैकी इंदिराबाईंचा उल्लेख आहे. व्यक्ती किती ‘मोठी’ आहे याचा मापदंड हे केवळ त्याच्या कार्यकर्तृत्वाने होत नाही, तर त्याचे अंतरंग किती मोठे आहे या निकषाने तो मोठा ठरत असतो. साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी केल्या जाणाऱ्या कुरघोड्या, त्याकरिता खेळलं जाणारं गलिच्छ राजकारण… पण या सर्वांवर स्वत:च्या सद्सद्विवेक बुद्धीला प्रमाण मानून ‘स्व’ चे अस्तित्व शाबूत ठेवणाऱ्या इंदिराबाई खरोखरीच श्रेष्ठ. अॅड. सायली नार्वेकर, विरार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सद्या परिस्थितीचे वास्तव चित्रण

‘लोकरंग’ (५ जानेवारी) मधील ‘शांत काळोखाचे तुकडे!’ हा मेघना भुस्कुटे यांचा लेख म्हणजे सद्या परिस्थितीचे वास्तव चित्रण! सध्या सगळे वातावरणच इव्हेंटमय झाले असून, कोणतीही गोष्ट शांततेत होत नाही. प्रदूषणाने व्यापलेल्या जगात गोंगाट वाढत असून टीव्ही, मोबाइल, इंटरनेट त्यावरील रील्स व अगणित मेसेज, व्हिडीओ यांमुळे मानसिक शांतता केव्हाच हरवली आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अजूनतरी चांगली आहे. पूर्वीसारखे रात्रीच्या काळोखात आकाशातील चंद्र-तारे आता पाहता येत नाहीत, पण वाढते प्रदूषण व अनेक समस्यांनी डोळ्यासमोर दिवसा तारे दिसण्याचे दिवस फार दूर नाहीत असे वाटते. प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर, नाशिक

हेही वाचा…सरले सारे तरीही…

मन अस्वस्थ करणारे लेख

‘लोकरंग’ (५ जानेवारी) मधील ‘शांत काळोखाचे तुकडे!’ हा मेघना भुस्कुटे व आदुबाळ यांचा ‘प्रपंच भोवरा, भोवरा, फिरतसे गरगरा’ हे लेख वाचले. हे दोन्ही लेख वाचून मन अस्वस्थ झाले. खरोखरच आम्ही विकासाकडे वाटचाल करीत आहोत की विनाशाकडे हेच समझेनासे झाले आहे. कुठेतरी इंग्रजीत वाचण्यात आले आहे की सध्या आमची स्थिती दोन शब्दात सांगता येते- Vuka : Volatility, Uncertainty, Complexity, and Ambiguity. Bani : Brittle, Anxious, Non- linear and Incomprehensible. These are some traits of the modern humans who are facing the age of chaos. हेच वास्तव आहे का? जयप्रकाश गुप्ता, नागपूर</p>

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on lokrang article about ajanthas pusatrehnapadsad indirabai sud 02