लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केलेले दोन पक्ष म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असे ते म्हणाले. आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरं आहे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे दोन पक्ष संपणार आहेत. एकूणच त्यांना असं म्हणायचं होतं की एक शरद पवार आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपणार आहेत. त्यामुळे सध्या पक्ष विलनीकरणाच्या गोष्टी सुरू आहेत. एक तर शरद पवार उद्धव ठाकरेंबरोबर विलीन होतील, किंवा शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण शरद पवार यांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही. तुतारी बंद पडणार आहे”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, या शरद पवार यांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. “३०-३५ जाग तर सोडा, शरद पवार यांचा पक्ष सध्या विलनीकरणाच्या स्थितीत पोहोचला आहे”, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांचा बावनकुळेंना टोला

दरम्यान, बावनकुळे यांच्या टीकेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांना टोला लगावला. “बावनकुळे हे फार मोठे राजकीय विश्लेषक झाले आहेत. त्यांनी आधी त्यांच्या निवडणुकीची काळजी करावी आणि जिंकून दाखवावं. ४ तारखेनंतर कोण कुठं जातंय, हे आपण नंतर बघू”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “ते भारताचे नागरिक नाहीत”, सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर काँग्रेस चार हात लांब? म्हणाले, “त्यांना खूप…”

पक्ष संपण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन दोन्ही बाजूला. या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसं दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठे जातील ते आत्ता मी सांगत नाही. पण दोन पक्ष दिसणार नाहीत”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला होता.