बच्चू कडू, राजू शेट्टीही संतप्त

परभणी : अतिवृष्टी होऊन गेली, आता शेतातला चिखल सुकला आहे असे म्हणून शेतकऱ्यांची कुचेष्टा करणारा असंवेदनशील कृषीमंत्री या राज्याला पहिल्यांदाच लाभला. एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना दुसरीकडे कृषीमंत्री परळीत सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत, त्यातले काही कार्यक्रम तर अशोभनीय आहेत अशी कडाडून टीका स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली. तर आमदार बच्चू कडू यांनीही आता सरकारच्या कानफटीत मारण्याची वेळ आली आहे असे उद्गार काढले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर  लोकांचा आक्रोश असताना कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत, जरा तरी लाज वाटली पाहिजे या शब्दात राजू शेट्टी यांनीही कृषिमंत्री मुंडे यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व इतर घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाचा एकत्रित पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी मानवत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पिकांच्या नुकसानग्रस्त भागास भेटी दिल्या व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!

मानवत तालुक्यातील वझुरसह अन्य काही गावांना छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी भेटी दिल्या. या तिघांनी सरकारवर जोरदार टीका केली. नदीच्या काठावरील ज्या शेतकऱ्याचे पहिलेच घर अतिवृष्टीच्या पुरात नुकसानग्रस्त झाले त्या शेतकऱ्यालाही अद्याप मदत न मिळाल्याने बच्चू कडू संतप्त झाले. तलाठ्याने पंचनामा केल्यानंतर तो अद्याप तहसील प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, मग प्रशासन नेमके काय करत आहे. पूरग्रस्तांना जी तातडीची मदत मिळायला हवी ती का मिळाली नाही. त्यांच्यासाठी छावण्या, तात्पुरते निवारे का उभे केले नाहीत असे अनेक प्रश्न यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केले. छत्रपती संभाजीराजे यांनी मोबाईलवर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना बच्चू कडू यांचा आवाज आक्रमक होत गेला. कशाला पदावर राहता, सोडून द्या पद. नुकसानग्रस्त पहिल्या घराला साधे सानुग्रह अनुदान भेटले नाही. आम्ही आता थेट तुमच्या घरी येऊ असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.या तीनही नेत्यांनी जिल्हा प्रशासनावर कडाडून टीका केली तसेच सरकारवरही जोरदार टीका केली. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतूनही मदत मिळणार नाही आणि विमा कंपनीच्या खिशातूनही मदत मिळणार नाही.या सरकारवर टीका करून उपयोग नाही आता सरकारच्या कानफटीत मारण्याची वेळ आली आहे असे बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events zws