शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे, तसतशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. एकीकडे शिवसेनेतून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत आहे तर दुसरीकडे त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत. त्याचवेळी, उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बंडखोरांचे मन वळवण्यात अपयशी ठरले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आता या राजकीय लढतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: रश्मी ठाकरे यांनी फोन लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत त्यांना आमदारांसोबत बोलण्यासाठी वळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे. तर काही बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. तसेच बंडखोर आमदारांकडूनही शिवसेनेसोबत असल्याची वक्तव्ये सातत्याने येत आहेत. त्यामुळे शिंदे गटात संभ्रम निर्माण झाला आहे.

२१ जूनपासून राजकीय नाट्य सुरू

महाराष्ट्रात सुरू असलेला हा राजकीय गोंधळ २१ जूनच्या सकाळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदारांसह महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड करत सुरतला गेले तेव्हा सुरू झाला. नंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले. हे बंडखोर आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल होते. ते सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यानंतर अपक्षांसह अनेक आमदार बंडखोर छावणीत दाखल झाले आहेत.

आमदारांनी राजीनामे दिल्यास पडणार महाविकास आघाडी सरकार

महाराष्ट्र विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ आहे आणि विश्वासदर्शक ठराव झाल्यास बहुमत १४४ आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीला १६९ जागा मिळाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी राजीनामा दिल्यास, महाविकास आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या खाली जाईल, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray wife rashmi thackeray called the wives of rebel shivsena mlas abn
First published on: 26-06-2022 at 12:25 IST