वाई : सातारा जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कांदाटी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये लक्ष घालण्याची मागणी आमदार मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, या व्यवहारांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबतची माहिती घेणार आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसहित १३ जणांनी अत्यल्प दरात जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी वाईच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत महाबळेश्वर तहसीलदारांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याबाबतची बातमी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयानेही या प्रकरणाबाबत अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

‘निसर्गसंपन्न असलेल्या कोयना खोऱ्यातील जंगलात सर्रास सुरू असलेली जमीनखरेदी, वृक्षतोड, उत्खनन, जमिनीचे सपाटीकरण, अवैध बांधकामे तातडीने रोखणे गरजेचे असून, ते न केल्यास पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होतील’, असा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे. त्याचप्रमाणे कोयनेतील गैरप्रकारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा : महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागांचा शब्द? छगन भुजबळांनी थेट आकडा सांगितला

या पार्श्वभूमीवर, ‘मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे’, असे आमदार मकरंद पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हेही आज (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे देसाई यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.