आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढताना दिसत आहेत. सुरुवातीला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सचिवालयाला अहवाल देऊन त्यांची तक्रार केली. त्यानंतर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली. पण आता तिथेही त्यांचं प्रशिक्षण होऊ शकणार नाहीये. कारण आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या LBSNAA अर्थात ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडेमी फॉर अॅडमिनिस्ट्रेशन’ने त्यांच्या जिल्हा प्रशिक्षणावर स्थगिती आणली असून त्यांना तातडीने पुढील कारवाईसाठी अकादमीत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत LBSNAA चे आदेश?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आयएएस खेडकर यांच्या वर्तनाविषयी मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्याशिवाय, त्यांनी सेवेत रुजू होताना सादर केलेल्या कागदपत्रांबाबतही संशय असून त्याची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील सर्व आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असणारी शिखर संस्था LBSNAA ने पूजा खेडकर यांच्या जिल्हा प्रशिक्षणावर स्थगिती आणल्याचा आदेश जारी केला आहे.

“राज्य सरकारकडून ११ जुलै २०२४ रोजी २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी खेडकर यांच्या वर्तनाबाबत प्राप्त झालेल्या पत्रानुसार हे आदेश काढण्यात येत आहेत. त्यानुसार पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण तातडीने स्थगित केलं जात असून त्यांनी ताबडतोब LBSNAA अकादमीमध्ये पुढील कार्यवाहीसाठी हजर व्हावं”, असे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत. तसेच, “राज्य सराकरने त्यांना सेवेतून ताबडतोब मुक्त करावं, जेणेकरून त्या २३ जुलै २०२४ च्या आत अकादमीमध्ये हजर होऊ शकतील”, असंही या आदेशपत्रात नमूद करण्यात आलं आहे. अकादमीचे उपसंचालक शैलेश नवल यांच्या सहीनिशी हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

“कालच असा काय साक्षात्कार झाला की…”, IAS पूजा खेडकर प्रकरणाशी नाव जोडल्याने पंकजा मुंडे संतप्त; म्हणाल्या…

राज्य सरकारची कार्यवाही

दरम्यान, प्रशिक्षण अकादमीनं पाठवलेल्या आदेशपत्रानुसार राज्य सरकारनं वाशिममधील प्रशिक्षण सेवेतून पूजा खेडकर यांना तातडीने मुक्त केल्याचं पत्र जारी केलं आहे. तसेच, प्रशिक्षण अकादमीनं घेतलेल्या निर्णयाची या पत्रातून त्यांना माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय, २३ जुलैपूर्वी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडेमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये हजर होण्याचे निर्देशही पूजा खेडकर यांना देण्यात आले आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीनिशी हे पत्र जारी करण्यात आलं आहे.

पूजा खेडकर यांच्यावरचे आरोप काय?

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठांशी गैरवर्तन करणे, त्यांचं केबिन परवानगीशिवाय ताब्यात घेणे, त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावणे अशा तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सचिवालयाला अहवालही सादर केला होता. त्यानंतर त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. मात्र, यादरम्यान त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी सादर केलेले ओबीसी प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र या कागदपत्रांवर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांनी सेवेत पद मिळवल्याचाही आरोप केला जात असून आता त्या आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.