'नेभळट सरकार' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना CM शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले "मला आक्रमक, धाडसपणा शिकवू नका, ४० दिवस..." | Maharashtra CM Eknath Shinde on Shivsena Uddhav Thackeray on Belgaon Issue Delhi G20 Meet sgy 87 | Loksatta

‘नेभळट सरकार’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना CM शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “मला आक्रमक, धाडसपणा शिकवू नका, ४० दिवस…”

आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे आक्रमक

‘नेभळट सरकार’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना CM शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “मला आक्रमक, धाडसपणा शिकवू नका, ४० दिवस…”
उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे आक्रमक

राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने खरंतर सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण, या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हे मंत्री सीमाभागांतील मराठी बांधवांची भेट घेणार असून राज्य सरकार मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही उत्तर दिलं.

विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांची सारवासारव; मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याने वाद

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की येताच शिंदे- फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव सुरू केली. दरम्यान, यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून हे नेभळट सरकार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. सीमा प्रश्नावर विरोधक काय करणार? या प्रश्नावर आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ, असा टोला ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

“दादा तुम्हाला कुठून माईक खेचायला…”, पत्रकार परिषदेला पोहोचताच उद्धव ठाकरेंची अजित पवारांना विचारणा, जयंत पाटीलही लागले हसू

एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

दिल्ली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आक्रमक भूमिकेवर भाष्य करणं टाळलं. मात्र, ‘बेळगांवमध्येच नव्हे तर, देशाच्या कुठल्याही भागांमध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही’, असं स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे बोम्मई यांना चपराक दिली.

कर्नाटकने सामंजस्य दाखवायला हवे होते!; मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

बेळगाव प्रश्नावर राज्य सरकार नेमस्त भूमिका घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्यावर, बेळगावसंदर्भात काही लोक मतप्रदर्शन करत आहेत, त्यांना एवढेच सांगायचं आहे की, आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. मी बेळगावच्या प्रश्नावर ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. ते मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) असताना बेळगावच्या जनतेला मिळणारे योजनांचे अनुदान बंद करण्यात आले होते. विद्यमान सरकारने संबंधित योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. सीमेवरील गावांसाठीही म्हैसाळ पाटबंधारे योजनेचे विस्तारीकरण केले जात आहे, त्यासाठी राज्य सरकार २ हजार कोटी देत आहे, असं शिंदे म्हणाले.

विराट मोर्चाला ‘शुभेच्छा’

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर, या पक्षांना विराट मोर्चासाठी शुभेच्छा आहेत असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

मोदींच्या बैठकीला गैरहजर राहून काय साध्य केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिंदे सहभागी झाले. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्दय़ांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले? हेच त्यांचे देशप्रेम आहे का? हेच राज्यावरील त्यांचे प्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले. ‘जी-२०’चे यजमानपद देशाला मिळणे ही खरेतर गौरवाची बाब आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:02 IST
Next Story
राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”