शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे ज्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केलं. आता या टीकेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलं. “काही लोक ‘कर भाषण, घे राशन’ या तत्त्वावर भाड्यावर घेतले आहेत,” अशी टीका राजू पाटलांनी केली. ते शनिवारी (३ डिसेंबर) कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू पाटील म्हणाले, “काही लोक बोलताना कुठल्याही थराला जाऊन बोलत असतात. मागे आजाराच्या नावावर जो ढोंगीपणा चालला होता त्यावर राज ठाकरे बोलले होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर करोना झालेला असतानाही मातोश्रीवर जाताना तोंडावरील मास्क काढला, गळ्यातील पट्टा काढला हे सर्व लोकांनी पाहिलं.”

“काही लोक ‘कर भाषण, घे राशन’ या तत्वावर भाड्याने घेतलेत”

“त्याआधी ते करोनाविषयी एवढी संवेदना दाखवत होते, मग स्वतःला करोना असताना लोकांमधून जाताना ती संवेदना कुठे गेली होती? त्यावर राज ठाकरे बोलले. त्यावर कोणी काही बोलत असेल, तर काही लोक ‘कर भाषण, घे राशन’ या तत्वावर भाड्याने घेतले आहेत,” अशी टीका करत राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना नाव न घेता टोला लगावला.

“…म्हणून मी ते ट्वीट केलं होतं”

“अशा लोकांच्या टीकेला तसं आम्ही महत्त्व देत नाही. परंतु, कार्यकर्ता म्हणून काही भावना मनात येते म्हणून मी ते ट्वीट केलं होतं,” असंही राजू पाटलांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”

हेही वाचा : “दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

“मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन”

“दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla raju patil answer shivsena leader sushma andhare over raj thackeray pbs
First published on: 03-12-2022 at 19:44 IST