लातूर : राज्यातील वैशिष्टय़पूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. जालनाची  दगडी ज्वारी, धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यातून पाठवलेल्या १८ प्रस्तावांना भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कास्तीची कोथिंबीर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. बासमती तांदूळ जसा असतो तसेच या कोथिंबिरीला वेगळा वास आहे. मुंबई, नागपूर या मोठय़ा शहरांसह अन्य देशातही कोथिंबीर निर्यातही करण्यात येते. 

बोरसुरी डाळ :  निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला डाळ असे संबोधले जात असले तरी या गावातील वरणात टाकल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा >>> पेणच्या गणेशमूर्तीना राजाश्रय

पानचिंचोली चिंच : पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. या वेळी त्याची वैशिष्टय़े मांडण्यात आली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी या कामासाठी विशेष लक्ष घातले होते. येथील पातडी चिंच उत्पादक संघाच्या वतीने व बोरसुरी येथील तूर डाळ उत्पादक संघाने बोरसुरी तूर डाळ विशेष भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे या तीन वाणाला आता देशभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

कुंथलगिरीचा खवा :  धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो.  हा भाग डोंगराळ आणि कुरळय़ा केसाच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे. 

तुळजापूरची कवडी : तुळजापूरला येणारे भाविक कवडय़ांची माळ घालतात.  कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज हे गळय़ात कवडय़ांची माळ घालत. 

जालन्याची ज्वारी : ही ज्वारी टणक असून, पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्टय़पूर्ण आहे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुणे येथील गणेश हिंगमिरे जीआय नामांकन क्षेत्रात काम करतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine products from maharashtra get geographical indication tag zws