राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस

“सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्ती सारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो.” असं म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचे अभिनंद करत, कौतुक केले. “आज महाराष्ट्राने एक नवीन विक्रम केला आहे. सन्मानीय अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरूण अध्यक्ष आहेतच, पण देशाचाही इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.” असं फडणवीसांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “या सभागृहाच्या अध्यक्ष स्थानाला एक विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो आणि विशेषता आपल्या विधानमंडळाची रचना अशी आहे, की गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो, नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की अगदी कर्नाटक, गोव्याच्या सीमेवरचा शेवटचा माणूस असो, प्रत्येकाच विचार त्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या सगळ्या या सभागृहात या सदस्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनित होतात आणि छोट्याती छोटा प्रश्न देखील सोडवण्याची क्षमता आणि मोठ्यातील मोठी अडचण देखील क्षमता या सभागृहात आहे. म्हणून मला असं वाटतं की या सभागृहाचं अध्यक्ष होणं, हा देखील एक अत्यंत भाग्याचा असा योग आहे, जो तुम्हाला लाभला याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.”

Maharashtra Assembly Speaker Election Live: एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली, उद्या महत्वाची परीक्षा; सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी

तसेच, “खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्ती सारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. खरंतर हे कठीण काम आहे, ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला तो न्याय वाटतो. ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो. पण शेवटी अनेकदा आपण असं म्हणतो, की कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक खरी एक खोटी, पण असं नाही एक त्यांची एक आमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना करावं लागतं. मला अतिशय आनंद आहे तुमच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. एक तरूण सहकारी म्हणून सभागृहातील तुमचं काम मी बघितलं. दोन्ही सभागृह असतील, उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेलं काम आणि विशेषता कायद्यात निश्चितपणे काय आहे हे समजून घेवून. न्यायालयाच्या कसोटीवरही आपला कायदा टिकला पाहिजे, यासाठी अतिशय चपखल असं मार्गदर्शन आपण सातत्याने करत होता. हे देखील मी बघू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं की या कायदेमंडळाला एक अतिशय कायद्यात निष्णात असलेले असे अध्यक्ष मिळाले आहेत. अर्थात या पूर्वीच्या सगळ्या अध्यक्षांनी कदाचित ते कायदेपंडित नसतीलही पण अतिशय उत्तम काम या आसनावरून केलं आहे. त्यामुळे याप्रसंगी त्यांचं स्मरण करणं आणि जे हयात आहेत त्यांचं अभिनंदन करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे.” असंही फडणवीस म्हणाले.

याचबरोबर “आज हा देखील एक योगायोग असेल की वरच्या सभागृहातील सभापती आणि खालच्या सभागृहाचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावायचं आहे. पण पुलं देशपांडे असं म्हणतात की, जावाई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे आणि ते जावयाचा उल्लेख असा करतात, की जावाई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. पण असं नाहीए त्यांचं प्रेम आहे सासऱ्यांवर.” असं देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड; बहुमतापेक्षा अधिक मतांनी विजयी
फोटो गॅलरी