Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. हे प्रकरण आता चांगलेच पेटले असून आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

,

मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला. अजूनही हा विषय हातातला आहे. लोकांच्या भावना मी ऐकल्या , उद्या काहीतरी स्फोट होईल तर मी जबाबदार असणार नाही. पोलीसांनी साडेतीन तास मजा बघत साधा गुन्हा नोंद केला नाही, आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करूनही तो इकडे तिकडे फिरतो आहे. हे सरकारला कसं चालतंय?” असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. “मी पूर्णपणे ग्रामस्थांबरोबर आहे, जो ग्रामस्थ निर्णय घेतली त्याबरोबर संभाजीराजे असतील”, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा>> संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सोडला हात…

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मस्साजोग गावतील नागरिकांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले जात आहे. गावकऱ्यांकडून आरोपांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गावकरी करत आहेत. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मान्य करत गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अद्याप दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हत्येमागील कारण काय?

६ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी प्रकरणात हस्तक्षेप केला आणि मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केल्याचा आरोप होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati on santosh deshmukh murder case warn cm devendra fadnavis beed massajog sarpanch murder rak