“फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे, ठाकरे नसते तर महाराष्ट्रात…”; शिवसेनेनं साधला निशाणा

“नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत.”

Thackeray
शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये साधला फडणवीसांवर निशाणा (फाइल फोटो)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमध्ये शिवसेनेवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शनिवारी उद्धव ठाकरेंनी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत घेतलेल्या सभेमधील आरोप प्रत्यारोपांना फडणवीस यांनी रविवारच्या सभेतून उत्तर दिलं. यावेळेस त्यांनी शिवसेनेसोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. आता फडणवीस यांच्या या सभेवरुन शिवसेनेनं भाजपा आणि विरोधी पक्ष नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय.

विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राची व मुख्यमंत्र्यांची यथेच्छ बदनामी केली
“वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता व उताराला लागलेली गाडी यांना ब्रेक लावणे कठीण असते. आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेमके असेच झाले आहे. त्यांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवरले नाही तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अपघात अटळ आहे. महाराष्ट्रात एकदा अपघात झाला की, दिल्लीच्या तंबूचा पायाही हलू लागेल. शिवसेनेच्या मुंबईतील सभेला फडणवीस व त्यांचे लोक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील असे वाटले होते, पण फडणवीसांनी शिवसेनेला उत्तर देण्यासाठी निवडली ती उत्तर भारतीय सभा. उत्तर भारतीय सभेत राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राची व मुख्यमंत्र्यांची यथेच्छ बदनामी केली,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

हा नव्याने संशोधनाचा विषय ठरला आहे
“त्यांच्या उत्तराचे सूत्र एकच होते ते म्हणजे, ‘‘तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू!’’ सध्या राममंदिराचा विषय चर्चेत असल्याने त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितले, ‘‘तुमच्या सत्तेचा ढाचा आम्ही खाली खेचणार!’’ लोकशाहीत हा अधिकार सगळ्यांना दिला आहे. ज्याच्यापाशी १४५ चे बहुमत आहे तो महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतो. आज १७० चे बहुमत ठाकरे सरकारकडे आहे. त्यामुळे फडणवीस गरजतात तसा ढाचा वगैरे पडणार नाही. त्यांनी बाबरीही स्वप्नात पाडली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत हा स्वप्नदोष शक्य नाही. मुळात अयोध्येत बाबरी पाडली तेव्हा भाजपाने बगला वर करून पळ काढला व तो दिवस त्यांच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. नंतर त्या ‘काळ्या दिवसा’चा हे लोक विजय दिवस वगैरे साजरा करू लागले. त्या ‘काळ्या दिवसा’च्या शिवसेनेस मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा फडणवीस नक्की कोठे होते व त्यांचे वय काय होते हा नव्याने संशोधनाचा विषय ठरला आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

…तर त्यांचा नागपुरात सत्कार करता येईल
“फडणवीस सांगतात, ते तर ढाच्याजवळ प्रत्यक्ष उपस्थित होते व बाबरी पाडण्यात त्यांचा प्रत्यक्ष हातभार होता, पण आडवाणी वगैरे प्रमुख लोक फडणवीसांचा दावा मान्य करीत नाहीत. पोलिसांच्या किंवा सीबीआयच्या कोणत्याही आरोपपत्रात त्यांचा उल्लेख नाही. पोलिसांनी फडणवीसांना साधे चौकशीसाठीही बोलावल्याची नोंद नाही. याउलट शिवसेना नेत्यांचे आहे. त्यामुळे फडणवीसांचा बाबरी प्रकरणात सहभाग होता की नाही याबाबत केंद्र सरकारनेच एखादी चौकशी समिती नेमायला हवी. फडणवीस हे त्या युद्धात होते हे सिद्ध झाले तर त्यांचा नागपुरात सत्कार करता येईल. कारण बाबरी प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी मनावर घेतले आहे व याबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना आहे, हे बरे नाही,” असा उपहासात्मक टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे
“फडणवीस हे उत्तर भारतीयांच्या सभेत बरेच बोलून गेले. त्यांनी टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. तेही जमले नाही. मराठी लोकांची सभा असली की, ते वेगळे बोलतात व हिंदी भाषिकांच्या सभेत ते दुसरेच बोलतात. कालच्या सभेत त्यांनी ‘हनुमान चालिसा’ वाचली. पायात चपला घालून ‘हनुमान चालिसा’ वाचण्याची आपली परंपरा नाही हे भाजपावाल्यांना कोणीतरी सांगायला हवे. उत्तर भारतीय श्रीराम व हनुमानाचे भक्त आहेत. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही. सीतामाईनेही तो निर्णय स्वीकारला हे विशेष, पण फडणवीसांची रामभक्ती तकलादू आहे. नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे हे मात्र नक्की,” असा टोला शिवसेनेनं लागवलाय.

ठाकरे नसते तर महाराष्ट्रात…
“फडणवीस यांना स्वतःच्या राज्यातले चांगले काहीच दिसत नाही. उत्तर भारतीयांच्या सभेत त्यांनी गंगेत वाहत गेलेल्या हजारो प्रेतांवर भाष्य केले नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून जे लाखो उत्तर भारतीय कोविड काळात उत्तर प्रदेशात गेले, त्यांना योगींच्या भाजपा सरकारने राज्यात प्रवेश करू दिला नाही. चार दिवस वेशीवरच अन्नपाण्याशिवाय उपाशी ठेवले. या अमानुष वागण्यावर श्रीरामही दुःखी झाले, पण फडणवीस यांच्या मनातला ‘राम’ जागा झाला नाही. हे कसले लक्षण समजायचे? सत्ता गेल्याचा इतका मानसिक परिणाम व्हावा? वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही, निधड्या छातीने संकटाचा मुकाबला करावा लागतो असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सुनावले आहे. शिवसेना म्हणजे वाघावर स्वार झालेल्या मर्दांचा पक्ष आहे व आज उद्धव ठाकरे त्यांचे नेतृत्व करीत आहेत. ठाकरे नसते तर महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान व अस्मिता खतमच झाली असती. शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे,” असा उल्लेख लेखात आहे.

मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त…
“फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळ्या फिती बांधून १०५ हुतात्म्यांचा अपमान करीत होते तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते. आज मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे व शिवसेनेमुळेच. फडणवीस यांची गाडी उताराला लागली आहे व भांडे घरंगळत आहे. ते वैफल्यग्रस्त असल्याने बेभान झाले आहेत. हे असेच राहिले तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपून जाईल. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena slams devendra fadanvis after is nasco rally scsg

Next Story
मध उत्पादनाबरोबरच पर्यटनाला चालना ; महाबळेश्वरातील मांघर ‘मधाचे गाव’, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी