आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांना वेग आला आहे. विविध पक्षात नेते मंडळी आणि पदाधिकारी प्रवेश करत आहेत. आज, वंचित बहुजन आघाडी, भाजपा आणि बीआरएस पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळ त्यांनी भाजपावर टीका केली.

“भाजपा, वंचित, बीआरएसमधील काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सरकारच्या कारभाराला कंटाळून, त्रासून आमच्या पक्षात आले आहेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर त्यांची आशा राहिली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला एवढी लोक भाड्याने का घ्यावे लागत आहेत. इंजिनाची चाकं निखळली का आणि स्टेपनीवर का चालावं लागतंय का? तुमच्याकडे एवढे लोक होते, ते कोठे गेले? ते तुम्हाला कंटाळले का? त्याचा विचार नेतृत्त्वाने पक्षाच्या हितासाठी करावा, अशी विनंती करतो. कोणे एकेकाळी मित्र होतो. जुन्या नात्यातून सांगतो की, स्वतःचा चेहरा आरशात पाहा. तुम्हाला मेकअपची गरज का लागते? याचा विचार करा”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा >> महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…

कणखर नेता पाहिजे

“एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे, हुकूमशाहाला स्वीकारणां घातक आहे. सरकार संमिश्र पाहिजे, कारण एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे, पण संमिश्र पाहिजे. कणखऱ नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे, जो देईल साथ त्यांचा करू घात असा पक्ष आम्हाला नकोय. सर्वांना सोबत घेऊन चालणारं इंडिया आघाडीचं सरकार प्रगतीच्या दिशेने नेऊ शकेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.