आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात आणि राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये आणि धर्मांमध्ये फूट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरीब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाकावे लागेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

”अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले?”

यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, मोदी-अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सूडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली. नीरव मोदी, ललित मोदी, गौतम अदाणी यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटला, या चोरांना चोर म्हटले तर देशात गुन्हा ठरतो? नरेंद्र मोदींचा भांडाफोड होऊ नये म्हणून खोट्या केसमधून राहुल गांधी शिक्षा सुनावण्यात आली, खासदारकी रद्द केली आणि सरकारी घर सोडण्यास सांगून बेघर केले. गांधी कुटुंबाने देशाला सर्वस्व अर्पण केले आहे, देशासाठी बलिदान दिले, त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि स्वतःचे घर दान केले आणि ते सरकारी घरात राहत असतानाही त्यांना बेघर करण्याचे पाप मोदी सरकारने केल्याचंही ते म्हणालेत.

मोदी-अदाणींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळे खोटी तक्रार करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक विभागाने धरणे आंदोलन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, एसी. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, भटक्या विमुक्त विभागाच्या अध्यक्षा पल्लवी रेणके, प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनावणे, जोजो थॉमस, नंदकुमार कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी विभागाचे सरचिटणीस धनराज राठोड यांनी केले.

”देशात ब्रिटिश सरकारसारखीच जुलमी सत्ता”

अत्याचारी, जुलमी ब्रिटीश सत्तेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातून हाकलून लावले, सध्या देशात ब्रिटीश सरकारसारखीच जुलमी सत्ता आहे, त्यांच्या हातातून देशाला वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे. मोदी-अदाणींच्या भ्रष्ट युतीचा भांडाफोड करा, सर्वसामान्य जनतेचे पैसे कसे लुटले, राहुल गांधी जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय आकसातून कारवाई केली, हे जनतेपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेस पक्षात विविध प्रकारचे ३९ सेल आहेत, या सेलच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला काँग्रेस विचारधारेशी जोडून हुकूमशाही आणि गरीब, दलित आदिवासी आणि अल्पसंख्याकविरोधी विरोधी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is modi afraid to answer the questions asked by rahul gandhi says nana patole vrd