मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमधून अभिनेता चिन्मय मांडलेकर घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मुलाच्या नावाचा संबंध अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी जोडल्यामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास नको म्हणून अभिनेत्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

“मला शिवरायांच्या भूमिकेमुळे लाखो लोकांचं प्रेम मिळालं. पण, त्या भूमिकेमुळे माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार असेल, तर मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की, इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. एक वडील, नवरा म्हणून माझं कुटुंब जपणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो.” असा सांगत अभिनेत्याने त्याचा निर्णय त्याच्या सगळ्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा : “ट्रोलिंगमुळे किती गोष्टी…”, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेची चिन्मय मांडलेकरने घेतली रजा, मृण्मयी देशपांडे म्हणाली…

चिन्मयने हा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी त्याच्या पत्नीने देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. अभिनेत्याने घेतलेल्या या निर्णयावर आता कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. गौतमी व मृण्मयी देशंपाडेंनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत घडल्याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ऋजुता देशमुख, अदिती सारंगधर या अभिनेत्रींनी चिन्मयच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : “चित्रपट सपशेल आपटला अन्…”, ‘त्या’ कठीण काळात अवधूत गुप्तेला कोणी दिली साथ? पहिल्यांदाच केला खुलासा

चिन्मय मांडलेकरच्या पोस्टवरील कमेंट्स

चिन्मय मांडलेकरच्या व्हिडीओवर अवघ्या काही तासांतच त्याच्या चाहत्यांनी सहाशेहून अधिक कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिला आहे. एक युजर लिहितो, “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केली नाहीतर हे ट्रोलर्स जिंकले असा अर्थ होईल. प्लीज तुम्ही हा निर्णय मागे घ्या.” तर, दुसऱ्या एका युजरने, “रिकामटेकडे लोक इतरांना ट्रोल करतात त्यांनी आयुष्यात काहीही केलेलं नसतं. दुसरे प्रगती करतात हे त्यांना बघवत नाही” अशी कमेंट अभिनेत्याच्या व्हिडीओवर केली आहे.

चिन्मय मांडलेकरच्या पोस्टवरील कमेंट्स
चिन्मय मांडलेकरच्या पोस्टवरील कमेंट्स

याशिवाय “दादा प्लीज निर्णयावर विचार कर”, “चिन्मय सर तुम्ही ट्रोलर्सकडे लक्ष नका देऊ” अशा असंख्य कमेंट्स करत चिन्मयच्या चाहत्यांनी घडल्या प्रकाराबद्दल व अभिनेत्याने घेतलेल्या या एवढ्या मोठ्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.