मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक-गायिका म्हणून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना ओळखलं जातं. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले. शो संपल्यावर पुढे काही वर्षांनी रोहित-जुईली एकमेकांचे चांगले मित्र झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रोहित-जुईलीचा विवाहसोहळा २०२२ मध्ये थाटामाटात पार पडला होता. परंतु, लग्नाआधी या जोडप्याने काही वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत लोकांची काय प्रतिक्रिया होती आणि याशिवाय सोशल मीडिया ट्रोलर्सविषयी नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत जुईलीने स्पष्ट मत मांडलं आहे.

हेही वाचा : मराठमोळा साज, पेशवाई लूक अन्…; ‘असं’ पार पडलेलं मुग्धा-प्रथमेशचं लग्न, ५ महिने पूर्ण होताच शेअर केला व्हिडीओ

जुईली म्हणाली, “आम्हाला दोघांना एकत्र कोव्हिडची लागण झाली होती. त्यावेळी सगळ्यांना आम्ही एकत्र राहत असल्याचं समजलं होतं. आमच्या आई-बाबांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. परंतु, त्या क्षणाला आम्हाला याबाबत आमच्या उर्वरित कुटुंबाला सुद्धा सांगावं लागणार होतं. तेव्हा याचे बाबा, माझे आई-बाबा आमच्या पाठिशी खूप खंबीरपणे उभे राहिले. तेव्हा जाणवलं हे आपलं कुटुंब आहे जे प्रत्येक क्षणाला आपल्याला साथ देतंय. त्यानंतर मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

जुईली पुढे म्हणाली, “आम्ही लॉकडाऊनमध्ये एक गाण्याचा व्हिडीओ टाकला होता आणि त्या व्हिडीओवर आम्हाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. “अरे हे दोघं एकत्र काय करत आहेत?”, “हे एकत्र राहत आहेत का?”, “तुमच्या आई-बाबांना माहिती आहे का?” अशा बऱ्याच कमेंट्स त्या व्हिडीओवर आल्या होत्या. मला त्याच नाही तर, सगळ्यात कमेंट्सबद्दल सांगायला आवडेल की, तुम्हाला काय गरज आहे? तुम्हाला प्रत्येकाच्या बाबतीत नाक काय खुपसायचंय? तुम्ही तुमचं बघा ना…असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीत आपलं स्वत:चं एक मत असतं, निर्णय असतो बाहेरचे कोणीच आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आम्हाला आमचं जगू द्या, तुम्ही तुमचं बघा.”

हेही वाचा : “शिस्त राहिली नाही, कलाकार १०-१२ तास…”, टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल आनंद इंगळे स्पष्टच बोलले; म्हणाले…

“आमच्या आई-वडिलांना सुद्धा काही नातेवाईकांनी फोन वगैरे करून सांगितलं होतं. या सगळ्यांना आमच्या आई-बाबांनी फारच धमाल उत्तर दिली. आमच्या पालकांना आधीच माहिती आहे हे समजल्यावर मग लोकांचे फोन येणं बंद झालं. पण, मी नक्कीच सांगेन लिव्ह इन रिलेशनशिपमुळे फायदा होता. फक्त आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय हे माहिती असलं पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिपचा अर्थ लाज वगैरे सोडलीये असा होत नाही. सगळेच पालक या गोष्टीला हो म्हणत नाही. कारण, त्यांना पण संबंधित मुलाबद्दल तेवढा विश्वास पाहिजे आणि पालक जरी हो म्हटले तरी, मला वाटतं आता प्रत्येकाला आपल्या मर्यादा माहिती असतात. आपल्यावर घरचे संस्कार खूप असतात. त्यामुळे लग्नाआधी एकमेकांना ओळखण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप राहायला पाहिजे.” असं रोहित आणि जुईलीने सांगितलं.