‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते अधिक सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामधून त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.

‘मराठा बटालियन’ या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळींनी लिहिलं आहे, “लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर ‘मराठा बटालियन’मध्ये काम करायची संधी मिळाली. या सिनेमांमध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं. हा व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे; तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता. मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचं होतं. पहिलाच दिवस, पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “आपण रिहर्सल करूया “, असं मला सांगून, मला कंफर्टेबल केलं. हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. अख्या शूटिंगभर हसत-खेळत, मजा-मस्ती करत हा ‘मराठा बटालियन’ त्यांनी पूर्ण केला. विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होतीच. त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे. सतत हसतं-खेळतं वातावरण ठेवायचे.”

हेही वाचा – ‘शोले’ चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना हायकोर्टाचा झटका, संपत्ती वादातील फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

“विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले. मराठी इंडस्ट्रीमधले ते सगळ्यात बिझी स्टार होते. ऐकावेळेला त्यांचे सहा-सात सिनेमे चालूच असायचे, असा हा एकमेव स्टार होता ज्याच्या डबिंगसाठी, ‘ते‘ जिथे शूटिंग करत असतील, तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बूक केला जायचा. बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता. फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते. ‘तू तू मी मी’ या एका नाटकात त्यांनी १४ भूमिका केल्या होत्या.”

“रमेश भाटकर तर स्टायलाइज्ड स्टार होते आणि फार भारी कलाकार पण होते ते. या तिघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं. मला खूप प्रोत्साहन दिलं. कौतुक केलं. हे तिघेही दिग्गजच होते . पण कधीही त्यांनी गर्व केला नाही. उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकाराला खूप सांभाळून घेऊन कामं केली. सिनेमांचे जुने सीन्स बघत असताना सतत असं वाटतं की ते आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला सोडून गेलेच नाहीयेत. त्यांच्याबरोबर काम करणं मी सतत मिस करत असतो. प्रेक्षकांच्या मनामध्ये तर त्यांनी त्यांची जागा निर्माण केलीच आहे. पण माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी जागा आहे. ते आता जिथे कुठे असतील, तिथे सुद्धा ते एकमेकांची खेचत असतील, मस्करी करत असतील. आजूबाजूंच्यांचं पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील, आनंद पसरवत असतील,” असं मिलिंद यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने २६व्या वर्षी घेतली दुसरी आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अभिनय बेर्डेसह अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जुन्या चित्रपटाबद्दल तुम्ही लिहिलेल्या आठवणी खूपच छान असतात… खूप छान लिखाण आहे तुमचं…वाचतच राहावस वाटतं…”, “तुमचे किती छान अनुभव आहेत. तुम्ही खूप नशीबवान आहात. असंच छान काम करत राहा”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी मिलिंद गवळींच्या पोस्टवर दिल्या आहेत.