दरवर्षी गणरायाच्या आगमनाची जशी मोठ्या माणसांना ओढ असते, त्याहून जास्त उत्सुकता अन् कुतूहल लहानांमध्ये दिसून येते. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं उर्मिलानं तिची मुलगी जिजाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्मिलाची मुलगी जिजा हिनं स्वत:च्या हातांनी बालगणेशाची मूर्ती तयार केल्याचं दिसत आहे. उर्मिलानं बाप्पाच्या सजावटीसाठी एका छोट्या टेबलावर निळ्या रंगाचं वस्त्र पांघरलं आहे. त्यावर जिजानं साकारलेल्या बालगणेशाची मूर्ती ठेवून फुलांची छान सजावट केली आहे. लेकीनं साकारलेल्या बालगणेशाचा व्हिडीओ पोस्ट करीत ऊर्मिलानं तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारे म्हणाली, “नमस्कार, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जिजानं मला आज सरप्राईज केलं. तिनं स्वतः तिच्या बाहुलीतून हा गोंडस गणू बाप्पा बनवला आहे. जिजा म्हणाली की, तिला गणेश चतुर्थी साजरी करायची आहे आणि या वर्षी तिनं बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीची सगळ्यांनी मिळून पूजा करायची आहे. ही सगळी बाप्पाची इच्छा असावी, असं समजून मीसुद्धा तिची कल्पना उचलून धरली अणि अशा प्रकारे काल आमच्या घरी बाप्पाचं आगमन झाले. यापूर्वी आम्ही बाप्पाला घरी आणायचो नाही; पण या वर्षी जिजामुळे हा बालगणेश खूप आनंद अणि समृद्धी घेऊन आमच्या घरी आला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया तिनं व्हिडीओ शेअर करताना दिली आहे.

हेही वाचा- “भाच्याने घडवली मूर्ती अन् दोन्ही मुलांनी…”; अभिजीत केळकरच्या घरी बाप्पाचं आगमन, शेअर केला व्हिडीओ

उर्मिलाच्या मुलीनं खेळण्यातल्या बाहुलीतून साकारलेल्या बालगणेशाची मूर्ती तयार करण्याबरोबर तिनं छोटा उंदीरमामादेखील तयार केला असल्याचं उर्मिलानं पोस्ट केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या बालगणेशाची पूजादेखील छोट्या जिजाच्या हातून करण्यात आली. तिनं साकारलेल्या बालगणेशाचं स्वागत करीत संपूर्ण कुटुंबातील सदस्य पूजेसाठी उपस्थित होते. या बालगणेशाच्या पूजेदरम्यान मिठाई, मोदक व फळं, असा प्रसाद ठेवण्यात आला होता.

हेही वाचा- गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…

उर्मिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ऊर्मिला कधी तिच्या डान्सचे व्हिडीओ, तर कधी तिच्या मुलीबरोबरचे व्हिडीओ पोस्ट करीत असते. तिच्या या व्हिडीओंना चाहते भरभरून पसंती देतात. अभिनयाव्यतिरिक्त ऊर्मिला क्लासिकल डान्सर असून, ती स्वत: डान्सचे क्लासेसदेखील घेते.