cm eknath shinde target uddhav thackeray over hindutva issue in dussehra rally zws 70 | Loksatta

तुमच्याकडून हिंदूविचारांना मूठमाती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

गेली अडीच वर्षे बाळासाहेबांचा अंश तुमच्यात आहे म्हणून मी गप्प होतो. मात्र, शिवसेना संपत चालल्यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेतली.

तुमच्याकडून हिंदूविचारांना मूठमाती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला.

मुंबई : पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याच्या हट्टापायी तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या हिंदूत्त्वाच्या विचारांना तिलांजली दिली. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या  संपत्तीचे वारसदार असला तरी, त्यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. 

शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन होताच, उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांचा कडकडाट करत ‘शिंदे साहेब आगे बढो, शिवसेनाजिंदाबाद’ च्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांना १२ फूट लांबीची चांदीची तलवार भेट देण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव, स्मिता ठाकरे,आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणा गडकरी यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  आपल्या दीड तासाच्या भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या हिंदूत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्यभरातून आलेल्या लाखो शिवसैनिकांसमोर प्रारंभीच नतमस्तक होत शिंदे यांनी अभिवादन केले. ही गर्दी आपल्या भूमिकेला राज्यभरातून मिळत असलेल्या पाठिंब्याचे द्योतक असून खरी शिवसेना कुठे आहे आणि कुणाबरोबर आहे, याचे  उत्तरच आज जनतेने दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. ठाकरे यांनी न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळविले असले तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार मात्र आमच्याबरोबरच आहेत. सत्तेच्च्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्वाच्या विचारांना मूठमाती दिली. लाखो सैनिकांनी घाम गाळून, रक्त सांडून उभी केलेली शिवसेना ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी गहाण टाकली. सेनाप्रमुखांचा रिमोट राष्ट्रवादीला दिला. त्यामुळे तुम्हाला शिवाजी पार्कमध्येच उभे राहण्याचा नैतिक अधिकाराच राहिलेला नाही. त्यामुळे आधी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळासमोर गुडघे टेकून राज्याच्या जनतेची माफी मागा, मगच आम्हाला जाब विचारा, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आहे. त्यांचा हिंदूह्दयसम्राट असा उल्लेख करण्याचाही तुमची हिंमत राहिलेली नाही. आम्ही मात्र आमच्या दैवतांच्या विचारांशी ठाम असून, बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जाऊ. गेली अडीच वर्षे बाळासाहेबांचा अंश तुमच्यात आहे म्हणून मी गप्प होतो. मात्र, शिवसेना संपत चालल्यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेतली. तुम्ही शिवसेनेशी गद्दारी केली असली तरी आम्ही मात्र शिवसेना आणि महाराष्ट्र वाचविण्यासाठी गदर – क्रांती केल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदीची मागणी हास्यास्पद असून देशाच्या उभारणीत संघाचे योगदान सर्वात मोठे आहे. संकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघच पुढे धावून येतो. राष्ट्रउभारणीत या संघटनेचा हात कोणीही धरु शकत नाही, अशी स्तुतीस्तुमने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर उधळताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले. अनुच्छेद ३७० हटविणे किंवा अयोध्या येथील राम मंदिर उभारण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न मोदी आणि शहा यांनी साकार केले आहे. मोदी यांना चहावाला म्हणणाऱ्या काँग्रेसची अवस्था आज काय झाली आहे ते पाहा. दाऊद, याकूबचे हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहा यांचे हस्तक होण्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे सरकार लोकांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यात रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री सन्मान योजनेत आता राज्य सरकारही सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.

दिघे यांचे पंखच छाटले

आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिले, जिल्ह्यात शिवसेना कशी उभी केली, याची विचारणा करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे दिघे यांची संपत्ती किती आणि कुणाच्या नावावर आहे, त्यांची मालमत्ता कुठे कुठे आहे, याची विचारणा केली होती. त्यांच्या या भूमिकेने आपल्याला धक्का बसला. दिघे यांच्याप्रमाणेचे सेनेत जे जे मोठे होतील, त्यांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

शिंदेशाही आणा – जयदेव ठाकरे

ठाकरे कोणाच्या गोठय़ाला बांधले जात नाहीत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका पटल्यामुळे त्यांना पािठबा देण्यासाठी आलो  आहोत, असे उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी सांगितले.   शिंदे हा धडाडीचा माणूस असून त्यांना एकटे पडू देऊ नका, त्यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, राज्यात शिंदेराज्य येऊ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे यांच्या घराण्यातील जयदेव, स्मिता यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. तसेच एका खुर्चीवर बाळासाहेबांची तसबीर ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांचा सेवक थापा हा अलीकडेच शिंदे गटात सहभागी झाला. त्यालाही व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. शिंदे यांनी भाषणात थापा यांचा उल्लेख केला. तसेच आनंद दिघे यांच्या भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

बडय़ा कोणाचा प्रवेश नाही

दसरा मेळाव्यात शिवसेनेचे बडे नेते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा गेले काही दिवस केला जात होता. पण शिवसेना आमदार , माजी नगरसेवक वा कोणत्याही बडय़ा नेत्याने या वेळी शिंदे गटात प्रवेश केला नाही.

गद्दारी तुम्हीच केली

‘‘आमचा गद्दार म्हणून उल्लेख केला जातो. गद्दारी आणि खोके यावरून आम्हाला हिणवले जाते. मात्र, आम्ही नव्हे, तुम्हीच २०१९ मध्ये गद्दारी केली होती’’, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी ठाकरे यांना दिले. जनमताचा कौल डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा तुमचा निर्णय म्हणजे जनतेच्या मताशी गद्दारीच होती, असे शिंदे म्हणाले.

बुलेट्स

– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर  आल्यावर गर्दीपुढे नतमस्तक झाले, तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

– मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही, असे व्यासपीठालगत फलक

 – व्यासपीठामागील  ‘एकनिष्ठ ’ दसरा मेळाव्याच्या मोठय़ा फलकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव व आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे

– शिंदे गटातील आमदारांवर अनेक नेत्यांचा हल्लाबोल, मिंधे गट, गद्दार असा उल्लेख

– ५० खोके, एकदम ओकेचा ठाकरेंसह अन्य नेत्यांकडून उल्लेख, मेळाव्यानंतर रावणरूपी खोकासुराचे दहन

– आम्ही ठाकरेनिष्ठ असे टी-शर्ट घालून शिवसैनिक आले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava 2022 : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यात पालिका निवडणुकांचे रणशिंग

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
राज ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल; पुणे, नाशिकमधील नगरसेवकांशी संवाद साधणार
गृहनिर्माण मंत्र्यांचे अधिकार म्हाडाला
मुंबई: गोवरबाबत रॅपरच्या माध्यमातून जनजागृती; सामाजिक संस्थांचा मदतीचा हात
प्रत्युषाच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Smartphone Tips and Tricks: तुम्हालाही स्मार्टफोनमध्ये खाजगी फोटो, व्हिडीओ लपवायचे आहे? ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा ‘हिडन फोल्डर’
FIFA World Cup 2022; इंग्लंड-वेल्सचे चाहते एकमेकांसोबत भिडले; खुर्च्या आणि लाथांनी केली मारहाण, पाहा व्हिडिओ
“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात
पुणे: कांदा, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, घेवड्याच्या दरात घट